सायबर विभागाकडून अज्ञाताविरोधात गुन्हा; तपास सुरू

प्रतिनिधी। गोवन वार्ता
पणजी : तिसवाडी तालुक्यातील एका नागरिकाला जादा परताव्याचे आमिष दाखवून ६७ लाख रुपयांचा गंडा घालण्यात आला. या प्रकरणी सायबर विभागाने अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.
सायबर विभागाने दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणी करंझाळे येथील एका ५१ वर्षीय नागरिकाने तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार, तक्रारदाराला ८४५८०७५३९१, ८९६१२४७६७४ आणि ९५८३३४२९५४ या मोबाईल व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून ‘पिहू अर्बन लेदर’ कंपनीचे अधिकारी असल्याचे भासवून संपर्क साधण्यात आला. संबंधित संशयितांनी तक्रारदाराला ‘दीप जीटीपी ग्लोबल ईटीएफ इन्व्हेस्टमेंट्स’ व्हॉट्सअॅपच्या ग्रुपमध्ये सहभागी करून घेतले. तक्रारदाराला त्यात पैसे गुंतवल्यास जादा मोबदला देण्याचे आमिष दाखवले. तक्रारदाराने १ ऑक्टोबर ते २४ ऑक्टोबर २०२५ या कालावधीत वेगवेगळ्या बँक खात्यांत सुमारे ६७ लाख रुपये जमा केले. याच दरम्यान तक्रारदाराला त्याची फसवणूक झाल्याचे लक्षात आले.
तक्रारदाराने सायबर क्राईम विभागात तक्रार दाखल केली. या तक्रारीची दखल घेऊन सायबर विभागाचे निरीक्षक अनुष्का पैबीर यांनी अज्ञात व्हॉट्सअॅप मोबाईल धारकांविरोधात भारतीय न्याय संहितेच्या कलम ३१८(४), ३१९(२) आरडब्ल्यू ३(५) आणि माहिती व तंत्रज्ञान कायद्याच्या कलम ६६ ‘डी’ अंतर्गत गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.
अशी झाली फसवणूक...
तक्रारदाराला ‘पिहू अर्बन लेदर’ कंपनीचा अधिकारी असल्याचे भासवून संपर्क साधण्यात आला.
त्याला ‘दीप जीटीपी ग्लोबल ईटीएफ इन्व्हेस्टमेंट्स’ व्हॉट्सअॅप ग्रुपमध्ये सहभागी करून घेतले.
‘दीप जीटीपी ग्लोबल ईटीएफ इन्व्हेस्टमेंट्स’ या कंपनीत जादा परताव्याचे आमिष दाखवून गुंतवणूक करण्यास सांगितले.
तक्रारदाराने १ ते २४ ऑक्टोबर दरम्यान विविध बँक खात्यांत सुमारे ६७ लाख रुपये गुंतवले.
काही दिवसांनंतर खाते बंद झाल्यामुळे तक्रारदाराला फसवणुकीचा संशय आला.