सोन्याच्या व्यवहारांतून जास्त परताव्याच्या हव्यासापोटी गमावले २.८२ कोटी रुपये

कुडचडेतील एकाला गंडा : अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल


20 mins ago
सोन्याच्या व्यवहारांतून जास्त परताव्याच्या हव्यासापोटी गमावले २.८२ कोटी रुपये

प्रतिनिधी। गोवन वार्ता
पणजी : सोन्याच्या व्यवहारांशी संबंधित गुंतवणूक केल्यास जास्त परतावा देण्याचे आमिष दाखवून कुडचडे येथील एका नागरिकाला २.८२ कोटी रुपयांचा गंडा घालण्यात आला. या प्रकरणी सायबर विभागाने अज्ञात मोबाईलधारकाविरोधात गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.
सायबर विभागाने दिलेल्या माहितीनुसार, कुडचडे येथील ४६ वर्षीय व्यक्तीने तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार, तक्रारदाराला १० सप्टेंबर २०२५ पूर्वी ८७२३०१५९७४, ९६६१२६४४५१ आणि ७५७६८९३७२२ या मोबाईल व्हाट्सअॅप क्रमांकावरून काही लोकांनी संपर्क साधला. संशयितांनी तक्रारदाराला सोन्याच्या व्यापाराची www.kdeonegold.net या संकेतस्थळासंदर्भात माहिती दिली. वरील संकेतस्थळाच्या माध्यमातून सोन्याच्या बाजारपेठेत गुंतवणूक केल्यास १५ टक्के व्याज देण्याचे आमिष दाखवले. तक्रारदाराला संकेतस्थळावर नोंदणी करण्यासाठी आणि गुंतवणूक करण्यासाठी प्रोत्साहित केले.
तक्रारदाराने ठरल्याप्रमाणे संकेतस्थळामार्फत वरील कंपनीत २ कोटी ८२ लाख ९१ हजार ४४३ रुपयांची गुंतवणूक केली. त्यानंतर सदर संकेतस्थळ तसेच कंपनी बनावट असल्याचे समोर आले. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच तक्रारदाराने सायबर विभागात तक्रार नोंद केली. पोलीस निरीक्षक दीपक पेडणेकर यांनी तक्रारीची दखल घेऊन अज्ञात मोबाईलधारकाविरोधात भारतीय न्याय संहितेच्या कलम ३१८(४), ३१९(२) आरडब्ल्यू ३(५) आणि माहिती व तंत्रज्ञान कायद्याच्या कलम ६६ ‘डी’ अंतर्गत गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.
सायबर फसवणुकीच्या वाढत्या घटनांबाबत चिंता
सायबर पोलीस तसेच अन्य विभागांच्या वतीने विविध माध्यमांतून सायबर क्राईमविरोधात जागृती केली जात आहे. तरीदेखील सायबर फसवणुकीचे प्रकार कमी होताना दिसत नाहीत. याबाबत चिंता व्यक्त होत आहे. नागरिकांनीच कोणत्याही आमिषाला बळी न पडता सजग राहून व्यवहार करणे आवश्यक आहेे.