चित्रपट बनविणे सोपे; मात्र विकणे अवघड : कुमार राज


28th November 2017, 10:00 am
प्रभाकर ढगे। गोवन वार्ता
पणजी : ‘तारा : दी जर्नी अॉफ लव्ह अँड पॅशन' आणि ‘यहाँ अमिना बिकती है' हे दोन चित्रपट लागोपाठ अॉस्कर नामांकनासाठी पात्र ठरल्याने निर्माते- दिग्दर्शक कुमार राज हे चर्चेत आले. मुंबईच्या एम्परियल थिएटरमध्ये ‘तारा' ने ५० वा सप्ताह पूर्ण करून बॉलिवूडमधील २१ वर्षांचा विक्रम मोडला तेव्हाच सिनेसृष्टीचे लक्ष त्यांनी वेधून घेतले होते. ‘मंथन : एक कश्मकश' या चित्रपटाद्वारे सिनेनिर्मिती क्षेत्रात उतरलेल्या कुमार राज यांच्या दोन चित्रपटांनी १६७ हून अधिक आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाला हजेरी लावून आतापर्यंत १५० आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळवले आहेत. त्यात उत्कृष्ट चित्रपट, उत्कृष्ट दिग्दर्शन, कला निर्देशन आदी पुरस्कारांचा समावेश आहे. ४८ व्या इफ्फीसाठी गोव्यात आलेले कुमार राज यांच्याशी साधलेला संवाद.
चित्रपट निर्मितीच्या क्षेत्रात अनेक वर्षे घालवावी लागतात तरीही लवकर यश मिळत नाही. आपल्या चित्रपटास एवढ्या कमी कालावधीत देशविदेशात यश मिळण्याचे काय रहस्य आहे?
- चित्रपट निर्मितीच्या क्षेत्रात मी तसा उशिराच आलो आहे. मला या क्षेत्राबाबत आधी कसलीही माहिती नव्हती. मी शिपिंग उद्योगात व्यस्त होतो. सहा वर्षांपूर्वी अपघातानेच या क्षेत्राकडे ओढला गेलो. चाळीशीनंतर आपला नेहमीचा व्यवसाय बदलला पाहिजे, असे म्हटले जाते. मी ४८ व्या वर्षी व्यवसाय बदलण्याचा निर्णय घेतला. चित्रपटाचे आकर्षण असल्याने चित्रपट निर्मिती क्षेत्रात उतरावे, असे वाटले. त्यासाठी मग मी अमेरिकेतील चित्रपट निर्मिती आणि दिग्दर्शन या अभ्यासक्रमाला प्रवेश घेतला व पूर्णवेळ विद्यार्थी बनून तो पूर्ण केला. त्यानंतर विपणन क्षेत्रात प्रावीण्य मिळविण्यासाठी व्यवस्थापन अभ्यासक्रम पूर्ण केला. मला वाटते चित्रपट निर्मितीमध्ये उतरण्याआधी मी त्याचा अभ्यास केला, या व्यवसायाची बलस्थाने तथा कमकुवत दुवे शोधले, त्यातील खाचाखोचा जाणून घेतल्या म्हणून मी सुरुवातीलाच यश मिळवू शकलो.
मनोरंजन उद्योगात एकाचवेळी व्यावसायिक यश मिळवायचे आणि प्रबोधनही करायचे, असे सिनेमाबाबत शक्य नसतानाही आपण मात्र हे दोन्ही उद्देश साध्य केले ते कसे?
- हिंदी व्यावसायिक सिनेमात मनोरंजन हा अविभाज्य घटक असला तरी कुशल दिग्दर्शक आपली प्रतिभा पणाला लावून आपणास हवा तो संदेश प्रेक्षकांना देऊ शकतो, हे माझ्या लक्षात आले होते. त्यामुळे चित्रपट निर्मिती करताना या दोन्हींचा समन्वय कसा साधता येईल, या बाबतीत मी दक्ष राहिलो. ‘तारा : दी जर्नी अॉफ लव्ह अँड पॅशन' या चित्रपटात राजस्थानमधील स्त्रियांचे शोषण, पुरूषप्रधान मानसिकता, त्याचे सामाजिक दुष्परिणाम, त्यात भरडली जाणारी कुटुंबे याकडे लक्ष वेधले आहे. ते करत असताना अबला ही प्रतिकूल परिस्थितीमध्ये देखील सबला कशी होऊ शकते, हा आशावादी संदेशही दिला आहे. ‘यहाँ अमिना बिकती है' हा चित्रपट देशव्यापी स्त्री अत्याचारावर बेतलेला आहे. छेडछाड, बलात्कार, शारिरीक व मानसिक अत्याचार, वेश्या व्यवसाय याचे चित्रण या सिनेमात आहे. पण इथेही मी केवळ अत्याचारग्रस्त स्त्री दाखवत नाही तर अत्याचारी पुरूषी मानसिकतेला धडा शिकविणारी बंडखोर नायिका उभी केली आहे. नवख्या रेखा राणाने या दोन्ही भूमिका समर्थपणे पेलल्या आहेत. एकदा तुम्ही तुमचे लक्ष निश्चित केले की व्यवसाय करताना प्रबोधन करणे अवघड असत नाही. थेटपणे जमले नाही तर सूचकपणे का होईना ते दाखवता येते.
चित्रपट निर्मिती तथा दिग्दर्शन करताना तुम्ही कशाला प्राधान्य देता? पैसा वसूल संकल्पना, कथा, सादरीकरण की आणखी काही ?
- मी चित्रपट निर्मितीसाठी माझा पैसा घालतो, म्हणजे तो वसूल झाला पाहिजे, हे ओघाने आलेच. त्यासाठी जी व्यावसायिक कौशल्य पणाला लावायला हवी ती मी लावतोच. पण असे करत असताना चित्रपटाची कथा सशक्त असावी, समाजाला काही तरी विचार देणारी आणि प्रेरक ठरणारी असावी, याकडे मी जाणीवपूर्वक लक्ष देतो. प्रेक्षकांचे मनोरंजन झाले तरच ते चित्रपट पाहतील, हे माहीत असल्याने तसा मसाला मला पुरवावा लागतोच. ही तशी तारेवरची कसरत आहे. पण ठरवले तर यशस्वी करता येते, याचा अनुभव घेत आहे.
भारतीय चित्रपट व्यवसायाचे सध्याचे स्वरूप कसे आहे?
- भारतात विविध भाषेतील मिळून सुमारे ४० हजार चित्रपट वर्षाला तयार होतात. पण त्यातील फक्त सरासरी २५० चित्रपट प्रदर्शित होऊ शकतात. चित्रपट बनविणे सोपे आहे पण ते विकणे मात्र अवघड आहे. सध्या पूर्ण लांबीचा चित्रपट बनवायचा झाल्यास दोन ते अडीच कोटी रुपये लागतात. अधिक भव्य दिव्य करायचा तर १० कोटी आणि पुढे कितीही खर्च येतो. जेवढा निर्मितीला खर्च येतो, तेवढाच किंवा त्यापेक्षा अधिक खर्च वितरण आणि प्रसिद्धीसाठी करावा लागतो. आपल्याकडे हौशी निर्माते-दिग्दर्शक चित्रपट तयार करतानाच सगळी रक्कम खर्च करतात. त्यानंतर खर्च करण्यास त्यांच्याकडे काही उरतच नाही. त्यामुळे चित्रपट कितीही चांगला बनला तरी तो प्रसिध्दीअभावी सर्वत्र प्रदर्शित होऊ शकत नाही. या सगळ्या अडचणींचा अभ्यास करूनच या क्षेत्रात पाऊल टाकायला हवे.