मॅजिक मशरूमची पुष्टी न झाल्याने रशियन नागरिकाची जामिनावर सुटका

हरमल येथे एएनसीने जप्त केले होते १.६९ कोटींचे ड्रग्ज

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
28th April, 11:34 pm
मॅजिक मशरूमची पुष्टी न झाल्याने रशियन नागरिकाची जामिनावर सुटका

म्हापसा : मधलावाडा - हरमल येथे जप्त केलेल्या सायलोसायबिन मॅजिक मशरुम या ड्रग्जची घटनास्थळी फिल्ड टेस्टिंग किटद्वारे चाचणी करण्यात आली नाही. सदर पदार्थ हा ड्रग्ज असल्याची पुष्टी होत नसल्यामुळे एएनसीने १.६९ कोटी रूपयांच्या ड्रग्ज प्रकरणात अटक केलेल्या संशयित आरोपी एवजिनी मोर्कोविन (३३) या रशियन नागरिकाची उत्तर गोवा अतिरिक्त जिल्हा न्यायालयाने (पणजी) सशर्थ जामिनावर सुटका केली.

१ लाख रुपये हमी रक्कम व समान रकमेचा हमीदाराच्या हमीनुसार हा जामीन अर्ज न्यायाधीश शेरीन पॉल यांनी मंजूर केला. अर्जदाराने आपला कायमस्वरूपी पत्ता व मोबाईल क्रमांक तसेच त्यात बदल केल्यास तो न्यायालयाकडे सादर करावा. याची चौकशी अधिकाऱ्यांनी शहानिशा करावी. न्यायालयाच्या परवानगीविना गोव्याबाहेर जाऊ नये, साक्षीदारांना आमिष किंवा धमकावण्याचा प्रयत्न करू नये, अशा अटी न्यायालयाने घातल्या आहेत.

एएनसीने हा ड्रग्ज मॅजिक मशरुम (सायलोसायबिन मशरूम) आहे की नाही हे तपासण्यासाठी घटनास्थळी फिल्ड टेस्टिंग करण्यात आल्याचे सूचित करत नाही. या टप्प्यावर न्यायवैद्यक प्रयोगशाळेचा कोणताही अहवाल नाही. हे पदार्थ मॅजिक मशरूम होते व ते निषिद्ध पदार्थ होते, असे निश्चितपणे सांगता येत नाही. संशयिताकडे सापडलेल्या हिरवट रंगाच्या पानांचा पदार्थ हा फिल्ड टेस्टिंग किट चाचणीमध्ये गांजा असल्याचे आढळून आले.

या गांजाचे प्रमाण २ किलो असून ते परिवर्तनीय प्रमाण आहे. त्यामुळे अमली पदार्थ कायद्याच्या कलम ३७ ची कठोरता इथे लागू होत नाही. त्यामुळे अर्जदार जामिनासाठी पात्र आहे, असा निष्कर्ष न्यायालयाने नोंदवला. तसेच न्यायवैद्यक विज्ञान प्रयोगशाळेकडून संशयिताकडून जप्त केलेला (गांजा व्यतिरिक्त) मॅजिक मशरूम हा प्रतिबंधित पदार्थ व्यावसायिक प्रमाणात आहे, याची पुष्टी करणारा अहवाल प्राप्त झाल्यास, हा मंजूर केलेला जामीन रद्द करण्यासाठी न्यायालयात जाण्याचे स्वतंत्र सरकारी पक्षाला न्यायालयाने दिले आहे.

सरकारी पक्षातर्फे सरकारी वकील अॅड. सामंत तर संशयिताच्यावतीने अॅड. कमलाकांत पोवळेकर यांनी न्यायालयात युक्तीवाद केला.

एवजिनीच्या खोलीत सापडले होते ड्रग्ज

दि. २७ मार्च २०२४ रोजी एएनसीने मधलावाडा हरमल येथे एवजिनी मोर्कोविन याच्या खाेलीतून २१८ ग्रॅम वजनाचे सायलोसायबिन (मॅजिक मशरुम), २ किलो गांजा तसेच काचेच्या बाटलीमध्ये लागवड केलेली ७.९ किलो वजनाची सायलोसायबिन (मॅजिक मशरुम) व १५० नग मॅजिक मशरुम कळे जप्त केली होती. या ड्रग्जची आंतरराष्ट्रीय बाजारात १ कोटी ६९ लाख ४७ हजार रुपये किंमत होती. पोलिसांनी एवजिनीच्या विरोधात गुन्हा दाखल करुन अटक केली होती. 

हेही वाचा