चित्रपट महोत्सव विविध शहरांत साजरा व्हावा : अॅबुर्ट


25th November 2017, 03:34 am
प्रतिनिधी। गोवन वार्ता
पणजी : चित्रपट महोत्सवाचा कालावधी वाढवून तो विविध शहरांत साजरा केल्यास चित्रपटांशी संबंधित असलेल्यांशी प्रेक्षकांना योग्य संवाद साधता येईल. यातून पर्यटनालाही चालना मिळेल, असे मत अमेरिकास्थित दिग्दर्शक सेबेस्तिएन अॅबुर्ट यांनी शुक्रवारी फिल्म बझारमध्ये बोलताना व्यक्त केले. यावेळी त्यांच्यासमवेत हॉलिवूडचा अभिनेता बोगदान इनाचू उपस्थित होता.
अॅबुर्ट म्हणाले, सध्या चित्रपट क्षेत्रात युवा पिढी मोठ्या प्रमाणात सहभागी होत असून, ती वेगळे काहीतरी करण्याचा प्रयत्न करत आहेत. पारंपरिक प्रेमकथा मांडण्याबरोबरच विविध सामाजिक प्रश्नही चित्रपटांच्या माध्यमातून समोर येत असल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान, अॅबुर्ट यांनी आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या निमित्ताने आयोजित फिल्म बझारचे कौतुक केले. चित्रपट क्षेत्रासाठी फिल्म बझार महत्त्वपूर्ण आहे. त्यामुळे देश-विदेशातील निर्माते-दिग्दर्शक, कलाकार यांना या क्षेत्राशी निगडित माहितीचे आदान-प्रदान करणे सोपे होते, असे ते म्हणाले.
बालकलाकार म्हणून मी चित्रपटसृष्टीत प्रवेश केला. आता समाजापर्यंत चांगला संदेश पोहोचावा, अशा प्रकारचा चित्रपट करण्याचा माझा प्रयत्न आहे. - बोगदान इनाचू, हॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता