भारत-कॅनडात आता संयुक्त चित्रपट निर्मितीसाठी प्रयत्न : नादिर पटेल

कॅनडातील चित्रपटसृष्टी बहरत असल्याचेही स्पष्ट


28th November 2017, 03:30 am
प्रतिनिधी। गोवन वार्ता
पणजी : भारत व कॅनडा विविध क्षेत्रांत एकमेकांना समृद्ध करण्याचा प्रयत्न करत आहेत. चित्रपट निर्मिती हा त्यातीलच एक घटक आहे. कॅनडामध्ये चित्रपट निर्मितीसाठी पोषक वातावरण आहे. आता भारत-कॅनडा संयुक्त चित्रपट निर्मितीसाठी प्रयत्न करणार असल्याची माहिती कॅनडाचे भारतातील उच्चायुक्त नादिर पटेल यांनी सोमवारी दिली.
४८ व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात (इफ्फी) कंट्री फोकसमध्ये कॅनडाला स्थान देण्यात आले आहे. त्यानिमित्त आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी त्यांच्यासमवेत फिल्म डिव्हिजनचे संचालक मनीष देसाई, कॅनेडियन चित्रपट निर्माते-दिग्दर्शक अॅडन गोएयन आणि इफ्फीचे संचालक सुमीत टंडन उपस्थित होते.
पटेल म्हणाले, कॅनडातील चित्रपट केवळ कथाच सांगत नाहीत, तर तंत्रज्ञानाच्या पातळीवरही ते प्रेक्षकांना आकर्षित करण्यात यशस्वी ठरले आहेत. त्यामुळेच जगभरातील विविध महोत्सवांत कॅनडातील चित्रपट सहभागी होत असून, त्यांना बक्षीसेही मिळत आहेत. यामुळे कॅनडातील चित्रपट क्षेत्र दिवसेंदिवस बहरत आहे. या क्षेत्रातील विकास असाच पुढे सुरू राहणार असल्याचे त्यांनी सांगितले. चित्रपट क्षेत्राव्यतिरिक्त कॅनडा भारतातील गुंतवणूकही ५० टक्क्यांपर्यंत वाढविणार असल्याची माहितीही त्यांनी दिली.
कॅनडात तंत्रज्ञानाद्वारे चित्रपट निर्मिती : गोएयन
इफ्फीच्या समारोपप्रसंगी जीवनगौरव पुरस्काराने गौरविण्यात येणारे कॅनेडियन निर्माते-दिग्दर्शक अॅडन गोएयन म्हणाले, कॅनडामध्ये तंत्रज्ञानाच्या मदतीने चित्रपट क्षेत्रात विविध प्रयोग केले जात आहेत. तेथील संस्कृती जगभर पोहोचविण्याचा प्रयत्न केला जात आहे. चित्रपट ही दिग्दर्शकाच्या मनातील गोष्ट अनेकांना सांगण्याचे प्रभावी माध्यम आहे. चित्रपटाबरोबरच आता टेलिव्हीजन माध्यमातही मोठ्या प्रमाणात संधी आहे. त्याचाही प्रेक्षकवर्ग वाढत असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.