चोरट्यांनी पुन्हा बोडगेश्वर मंदिरातील फंडपेट्या फोडून पळवली १२ लाखांची रोकड

दोन महिन्यांनंतर मंदिरात पुन्हा चोरी; चार बुरखाधारी चोरट्यांनी सुरक्षारक्षकाला बांधून ठेवत फोडल्या फंडपेट्या

Story: प्रतिनिधी । गोवन वार्ता |
29th April, 09:27 am
चोरट्यांनी पुन्हा बोडगेश्वर मंदिरातील फंडपेट्या फोडून पळवली १२ लाखांची रोकड

म्हापसा : येथील सुप्रसिद्ध श्री बोडगेश्वर संस्थानात दोन महिन्यांनंतर आज पुन्हा चोरट्यांनी दोन फंडफेट्या फोडून अंदाजे १२ लाखांची रोकड लंपास केली आहे. चार बुरखाधारी चोरट्यांनी जीवे मारण्याची धमकी देत सुरक्षा रक्षकाला खुर्चीला बांधले आणि रोकड लंपास केली. याप्रकरणी देवस्थान समितीने म्हापसा पोलिसांना कळवल्यानंतर पोलिसांनी धाव घेऊन पंचनामा करत तपासाला गती दिली आहे.

म्हापशातील श्रीदेव बोडगेश्वर संस्थान गोव्यासह महाराष्ट्र, कर्नाटकातही प्रसिद्ध आहे. नवसाला पावणारा देव म्हणून त्याची ख्याती पसरत चालली आहे. त्यामुळेच गरीबांपासून  धनदांडग्यांपर्यंत अनेक भक्त दर्शनासाठी येत असता. मोठ्या प्रमाणात अर्पण देत असतात. पण, या देवस्थानाकडे चोरट्यांची वक्रदृष्टी फिरल्याने त्याच्या सुरक्षेचा प्रश्न आता ऐरणीवर आला आहे. या ठिकाणी देवस्थान समितीने सुरक्षारक्षक नेमला असला तरी ती पुरसे नसल्याचेही आता स्पष्ट होत आहे. या देवस्थानात दोन महिन्यांपूर्वीच म्हणजे २८ मार्च रोजी ४.३० वाजता चोरट्यांनी देवाच्या पादुकांची पेटी फोडल्याने खळबळ माजली होती. त्याप्रकरणी म्हापसा पोलिसांनी लगेच तपासचक्रे गतिमान करत काहीच तासांत सागर शिंदे (४०) व आनंद नाईक (४०) या मूळ कर्नाटक येथील संशयितांना गजाआड केले होते. मात्र, याच ठिकाणी आज चार बुरखाधारी चोरट्यांनी दोन फंडपेट्या फोडून भक्तांनी अर्पण केलेल्या पैशांवर डल्ला मारला.

चोरीचा सर्व प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. सीसीटीव्हीतील फुटेजप्रमाणे, चार धिप्पाड चोरटे उत्तररात्री २.०७ वाजता बुरखा घालून देवस्थानात शिरले. त्यानंतर चौघांनी तेथील सुरक्षारक्षकाला चाकूचा धाक दाखवला आणि देवस्थानच्या मागच्या बाजूला नेऊन खुर्चीला बांधले. त्यानंतर मंदिरातील दोन्ही फंडपेट्या फोडल्या. पहाटे ३ वाजता एक व्यक्ती दर्शनासाठी देवळात आल्यानंतर त्याला हा सर्व प्रकार दिसला. त्याने सुरक्षारक्षकाला सोडवले. त्यानंतर देवळाजवळील पुजाऱ्याच्या घरी जाऊन दोघांनी माहिती दिली. पुजाऱ्याने देवस्थान समितीला संपर्क साधला. देवस्थान समितीने लगेच म्हापसा पोलिसांना माहिती दिली. देवस्थानच्या माहितीनुसार, फंडपेट्यांमध्ये अंदाजे १२ लाख रुपये होते.

या घटनेची माहिती मिळताच म्हपासा पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी पंचनामा करत तपासकामाला गती दिली आहे.

हेही वाचा

म्हापशातील श्री बोडगेश्वर देवस्थानातील पादुकापेटी फोडणारे दोन चोरटे गजाआड!

हेही वाचा