२८ जवानांची शौर्यगाथा पॅनफिलोव्ह २८


26th November 2017, 03:20 am
स्वत:च्या मातृभूमीच्या रक्षणासाठी बलाढ्य हिटलरच्या नाझी सैन्याशी प्राणपणाने लढणाऱ्या २८ जवानांची शौर्यगाथा सांगणारा ‘पॅनफिलोव्ह २८' हा रशियन चित्रपट. रशियातील प्रसिद्ध किम ड्र्युझिनिन आणि अँड्रे शेलॉप या जोडगोळीने दिग्दर्शित केलेला हा चित्रपट शनिवारी आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात दाखविण्यात आला. नोव्हेंबर १९४१ मध्ये रशिया आणि जर्मनीत झालेल्या युद्धावर बेतलेला हा चित्रपट प्रेक्षकांच्या काळजाचा ठाव घेतो.
शेकडो ज्यूंची कत्तल करणारा जगातील क्रूर हुकूमशहा म्हणून ओळख असलेल्या अॅडॉल्फ हिटलरने नेहमीच रशियावर वर्चस्व प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केला. त्यादृष्टीने त्याने नोव्हेंबर १९४१ मध्ये रशियावर चाल केली. याची माहिती मिळताच रशियन लष्कर जर्मनीच्या बलाढ्य सैनिकांना भिडण्यासाठी तयारी सुरू करते. जर्मनीच्या मानाने आपल्याकडे युद्धासाठी आवश्यक शस्त्रसाठा अत्यंत अपुरा आहे, याची जाणीव असतानाही कोणत्याही परिस्थितीत आपल्या मातृभूमीचे रक्षण करायचेच, असा ठाम निर्धार करून रशियन लष्कर युद्धासाठी आवश्यक तोफा, दारुगोळा तयार करते. जर्मन सैनिकांना मॉस्कोच्या सीमेवरच रोखण्यासाठी रशियाचे जवान तेथे बंकर तयार करतात, त्या परिसरात मोठी चर मारली जाते आणि त्यात बसून जर्मन सैन्याचा प्रतिकार करण्यासाठी ते सज्ज होतात. पण प्रचंड मोठे रणगाडे, बंदुका, बॉम्ब, रायफली अशा युद्ध साहित्याने सज्ज असलेले जर्मन सैन्य रशियन सैन्यावर तुडून पडते आणि रणगाड्यांद्वारे त्यांचे बंकर उद्धवस्त करते. पण हार न मानता रशियन सैन्य जर्मन सैन्याला संयमाने जवळ येऊ देते आणि युक्तीने त्यांच्यावर हल्ला चढवत त्यांच्या हजारो सैनिकांसह रणगाडेही नष्ट करते. अचानक घडलेल्या या प्रकारामुळे जर्मन सैन्याच्या पायाखालची वाळू सरकते आणि ते माघार घेते. पण चिडलेले जर्मन सैनिक पुन्हा रशियन सैन्यावर चाल करते. त्यात रशियाचे अनेक जवान धारातीर्थी पडतात. पण त्यातून वाचलेले २८ सैनिक स्वत:जवळ असलेल्या अपुऱ्या साहित्यानिधी जर्मन सैन्याचा प्रतिकार करतात. पण त्यातील सहा जवान वगळता इतरांचाही मृत्यू होतो. शेवटी शिल्लक राहिलेल्या सहा जवानांकडे लढण्यासाठी साहित्यच नसते. तरीही जवळ असलेले चाकू, कुऱ्हाड अशा हत्यारांसह नाझी सैन्याशी लढण्यास ते तयार होतात आणि नाझी सैन्याला बंकरजवळ आणण्यास भाग पाडतात. तोच रशियन सैन्यातील जिवंत जवान गनद्वारे सुमारे ५० ते ६० नाझी सैनिकांचा खात्मा करतो. शेवटी आपले आणखी जवान मारले जाऊ नयेत, म्हणून नाझी सैनिक युद्धातून माघार घेतात.
चित्रपटातील युद्धाचे प्रसंग तर हुबेहुबपणे दाखविण्यात आले आहेत. युद्धाची तयारी करत असताना रशियन लष्करातील एकजूटपणा, मातृभूमीवर असलेले त्यांचे प्रेम स्पष्ट होत जाते. या युद्धाचा रशियातील समाज, राजकारण यावर कसा परिणाम झाला, हेसुद्धा दिग्ददर्शकांनी उत्कृष्टरित्या दाखविले आहे.