उतारवयातील पती-पत्नीतील नातेबंध दर्शविणारा कॅन्डेलरिया


26th November 2017, 03:20 am
संपूर्ण आयुष्य एकमेकांसोबत काढलेल्या सत्तरीचा टप्पा पार केलेल्या पती आणि पत्नीमधील संबंधांचे दर्शन इफ्फीत शुक्रवारी झळकलेल्या ‘कॅन्डेलरिया' या चित्रपटातून होते. केवळ मृत्यू हाच शेवट मानत जगणाऱ्या दोन जीवांच्या आयुष्यातही एखादी घटना कसा बदल करत जाते, याचे सुंदर चित्रण चित्रपटात करण्यात आले आहे.
सोव्हिएत संघातून विभक्त झाल्यानंतर हवानात शीतयुद्धाची परिस्थिती निर्माण झाली होती. त्यानंतरच्या घडामोडी दिग्दर्शक जॉनी हेड्रिंक्स यांनी या चित्रपटातून दाखविल्या आहेत. ७६ वर्षीय व्हिक्टर ह्युगो आणि ७५ वर्षीय केन्डेलरिया या पती-पत्नींना मुले नसल्याने ते दोघेच राहत असतात. एकमेकांच्या साथीने जीवन जगताना त्यांच्यातील लटकी भांडणे, प्रेम दाखविले जात आहे. म्हातारपणामुळे वाढलेला चिडचिडपणा यासह आर्थिक अडचणींचा सामना त्यांना करावा लागत असतो. घरात त्या दोघांशिवाय कोंबडीची पिल्ले असतात. ज्यांच्यावर केन्डेलरिया मुलांप्रमाणे प्रेम करत असते. अशाप्रकारे ठराविक दिनक्रमात दिवस जात असतानाच केन्डेलरिया काम करत असलेल्या ठिकाणी तिला व्हिडिओ कॅमेरा मिळतो. ह्युगो तो कॅमेरा परत करण्यास सांगतो. मात्र, त्या कॅमेऱ्याद्वारे शूटिंग करत ते एकमेकांप्रतीचे प्रेम व्यक्त करतात. यातून त्यांच्यातील संवाद वाढत जाऊन दोघांनाही एकमेकांचे एकमेकांवर किती प्रेम, काळजी आहे, याची जाणीव होते. याचवेळी ह्युगोचे वजन कमी होत असल्याने त्याला डॉक्टरकडे नेले असता, डॉक्टर रक्त, लघवीच्या अहवालानंतर कारण स्पष्ट होईल, असे सांगत काळजी घेण्याच्या सूचना देतात. त्यानंतरही ते दोघे एकमेकांना खूश ठेवण्याचा आपापल्यापरीने प्रयत्न करत असतात. त्यासाठी कॅन्डेलरिया आपल्या कानातील डुल विकून ड्रेस भाड्याने घेते. तर ह्युगो एका व्यापाऱ्याला घड्याळ विकून त्यातून कॅन्डेलरियाला पार्टी देतो. अचानक एक दिवस कॅमेरा हरवतो व तो ह्युगोने घड्याळ विकलेल्या व्यापाऱ्याला मिळतो. तो व्यापारी या दोघांतील रोमान्सच्या व्हिडिओची बाजारात विक्री करतो. ह्युगो त्या व्यापाऱ्याकडे गेल्यानंतर तो व्यापारी त्याला आणखी व्हिडिओ आणण्यास सांगत त्याला पैसे देतो. सुरुवातीला नको म्हणणारी कॅन्डेलरिया आर्थिक अडचण ओळखून व्हिडिओ काढण्यास तयार होते. ते व्हिडिओ ह्युगो त्या व्यापाऱ्याला देत नाही. त्यामुळे व्यापारी घरी येतो. यावेळी कॅन्डेलरिया त्याला व्हिडिओ कॅमेरा देत यापुढे व्हिडिओ मिळणार नसल्याचे सांगते. ह्युगोला कॅन्सर असल्याचे समजल्यानंतर ह्युगो चिंतेत पडतो. मात्र, कॅन्डेलरिया एकमेकांच्या साथीने जगतानाच जीवनाचा आनंद लुटण्याचे ह्युगोला सांगते व त्यांचे आयुष्य पुढे सुरू राहते.