आव्हानात्मक भूमिका साकारायला आवडते : रेखा राणा


26th November 2017, 03:19 am
आव्हानात्मक भूमिका साकारायला आवडते : रेखा राणाप्रभाकर ढगे
गोवन वार्ता
पणजी : ती आली, तिने पाहिले आणि ती जिंकली, हा योगायोग सहज घडून येण्याएवढी हिंदी सिनेसृष्टी नक्कीच सोपी राहिलेली नाही. सर्वच पातळीवर असलेली गळेकापू स्पर्धा, वशिलेबाजी आणि एकमेकांचे पाय ओढण्यासाठी चाललेली चढाओढ अशा वातावरणातही एखाद्या नवोदित अभिनेत्रीच्या पहिल्याच चित्रपटाला ऑस्कर नामांकन मिळते, तेव्हा नक्कीच ती सर्वांचे लक्ष वेधून घेते. ‘तारा : दी जर्नी ऑफ लव्ह अँड पॅशन' हा अभिनेत्री रेखा राणाचा पहिला सिनेमा गोल्डन ज्युबली बनून थेट आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवातून ऑस्करपर्यंत पोहोचला. ‘यहाँ अमिना बिकती है' हा दुसरा बहुचर्चित सिनेमाही याच मार्गाने ऑस्कर नामांकनास पात्र ठरला. ४८ व्या इफ्फीतील फिल्म बझारमध्ये दाखल झालेल्या रेखा राणाशी यानिमित्ताने केलेली बातचीत.
तुझ्या पहिल्याच हिंदी चित्रपटाने देशात आणि विदेशातही धूम केली. या चित्रपटाला आतापर्यंत १२६ जागतिक चित्रपट महोत्सवांत प्रदर्शित होण्याची संधी मिळाली, तर विविध १६७ विभागांत आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळाले. पदार्पणातच मिळालेल्या या यशाचे वर्णन तू कसे करशील?
उत्तर : माझ्या दृष्टीने हे यश खूपच प्रेरणादायी, सिने प्रेक्षकांच्या अपेक्षा वाढविणारे आणि मला आणखी पुढे जाण्यासाठी मार्गदर्शक ठरणारे आहे. कुमार राज प्रॉडक्शनचा हा पहिलाच सिनेमा होता, जो देशात गोल्डन ज्युबली ठरला आणि त्याला ऑस्करसाठी नामांकन मिळाले. एखाद्या नवोदित कलाकारासाठी एवढा मोठा ब्रेक मिळणे खरोखरच अविश्वसनीय वाटते. पण माझ्याबाबतीत मात्र ते घडून आले आहे. त्यात या चित्रपटाचे दिग्दर्शक, निर्माते आणि तंत्रज्ञ यांचा तेवढाच वाटा आहे. कुमार राज यांनी नवोदित असूनही मला या चित्रपटातील मध्यवर्ती भूमिका दिली आणि एक आव्हान पेलण्याची संधी मिळाली. या चित्रपटाचा विषय, सादरीकरण, कलाकारांचा अभिनय, तांत्रिक बाजू, शैली, चित्रीकरण या सर्वच अंगांचा विचार होऊन त्यास देश-विदेशातील प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळाला. बंजारन असलेली एक साधी स्त्री कसा व्यापक संघर्ष करू शकते, याची प्रेरक कथा यात आहे.
अभिनय क्षेत्रात ठरवून आलीस का? पहिल्या सिनेमापासून तुला भूमिकाही स्त्रीप्रधान किंवा चर्चेतील विषयावरच्या मिळत आहेत. सिनेमे देश-विदेशात गाजत आहेत, हा योगायोग आहे का?
उत्तर : अभिनय क्षेत्रात मी ठरवून आले आहे. आपल्याला याच क्षेत्रात करियर करायचे आहे, असे ठरवल्यानंतर देशात आणि विदेशात जाऊन अभिनय प्रशिक्षण पूर्ण केले. त्यानंतर सलग पाच वर्षे मी हिंदी रंगभूमीवर विविध नाटकांतून भूमिका केल्या. मलेशिया, दुबई, सिंगापूर, अबुधाबी, अरब अमिरात अशा देशांतही आमच्या नाटकाचे प्रयोग झाले. अमेरिकेतील लॉस एंजिल्स येथे अभिनय प्रशिक्षण घेत असतानाच मला निर्माता-दिग्दर्शक कुमार राज यांनी ‘तारा' चित्रपटासाठी निवडले. मिळालेली पहिलीच भूमिका अतिशय आव्हानात्मक होती आणि मला अशाच भूमिका करायला आवडते. ‘तारा'मधील बंजारन आणि ‘अमिना'तील अमिना या दोन्ही भूमिका बंडखोर स्त्रीच्या आहेत. ‘अब होगा धरना अनलिमिटेड' हा समाजसेवक अण्णा हजारे यांच्यावरील सिनेमा असाच विचारप्रधान आहे.
तुझ्या दृष्टीने चित्रपट काय आहे? केवळ मनोरंजन, माहिती की काही उपदेश ?
उत्तर : मनोरंजन, माहिती आणि उपदेश हे तिन्ही घटक सिनेमात असतातच. पण त्याही पलीकडे सिनेमा आहे. खरे तर मी असे म्हणेन की आपण सिनेमाकडे जसे पाहतो, तसा तो दिसतो. समाजात जे घडते त्याचेच प्रतिबिंब कला, साहित्य, सिनेमा यात उमटत असते. आम्ही कलाकार, तंत्रज्ञ, दिग्दर्शक, निर्माते ते प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत असतो.
अभिनय क्षेत्रातील करियरची यशस्वी सुरुवात, मिळत असलेले मोठे यश आणि त्या जोडीला सामाजिक बांधिलकीचे भान जोपासणे, हे तुला कसे काय जमते?
उत्तर : खरे तर करियरच्या सुरुवातीला आपण जास्तीत जास्त यश मिळविण्याच्या मागे असतो. या क्षेत्रात असलेली तीव्र स्पर्धा पाहिली तर त्यात काही वावगे नाही. कारण तुम्ही इथे पाय रोवून उभे राहणे, पुढे जाणे, यश मिळविणे खूपच कठीण आहे. अशा परिस्थितीत सामाजिक बांधिलकी वगैरे जपायला वेळ असत नाही. पण मला सुरुवातीपासून वाटत आले आहे की, आपण व्यक्तिगत यश मिळविण्यासाठी जेवढी मेहनत घेतो, तशीच ती आपल्या आजूबाजूच्या लोकांना आनंद देण्यासाठीही जमेल तशी घ्यायला हवी. याच जाणिवेतून मी रोमानियाची सदिच्छा दूत बनले. दी हार्ट ऑफ इंडिया फाऊंडेशनमार्फत सुमारे ३५ हजार गरजू मुलांच्या शिक्षणाचा खर्च केला जातो. त्यासाठी मी माझे यथाशक्ती योगदान देत असते.