प्रतिनिधींकडून रविवार सार्थकी

सुटीमुळे सर्वच थिएटर हाऊसफुल्ल; महावीर उद्यानात बालक - पालकांची गर्दी


27th November 2017, 03:48 am
प्रतिनिधी। गोवन वार्ता
पणजी : आयनॉक्स, कला अकादमी तसेच मॅकेनीज पॅलेसमधील दोन्ही थिएटर रविवारी हाऊसफुल्ल झाली होती. शिवाय सुटीचा दिवस असल्यामुळे इफ्फी स्थळांवरही स्थानिकांनी केली होती. इफ्फी प्रतिनिधींनी रविवारी मिळेल त्या चित्रपटाचे तिकीट घेत आनंद लुटला.
प्रतिनिधी म्हणून नोंदणी करूनही कामांमुळे अनेकांना चित्रपटांचा आनंद घेता येत नाही, अशांनी रविवारचा सुटीचा दिवस सार्थकी लावल्याचे दिसून आले. अनेक आस्थापनांना सुट्टी असल्यामुळे प्रतिनिधी म्हणून नोंदणी केलेल्यांनी सकाळपासूनच चित्रपट पाहण्यासाठी गर्दी केली होती. त्यामुळे सकाळपासून सर्वच खेळ हाऊसफुल्ल झाले होते. सुमारे ८०० लोकांच्या बैठकीची व्यवस्था असलेले कला अकादमीचे सभागृहही पूर्ण भरलेले होते. तसेच चित्रपटगृहांत प्रवेश मिळवा, यासाठी अनेक प्रतिनिधी वेळेआधीच रांगेत उभे राहताना दिसत होते. त्यामुळे रशलाईनमध्ये (विनातिकीट) उभे राहून अनेकदा चित्रपटगृहांत प्रवेश मिळविणाऱ्या प्रतिनिधींचाही हिरमोड होताना दिसत होता. दरम्यान, इफ्फीच्या आवारात थाटण्यात आलेल्या स्टॉल्सवर माहिती घेण्यासाठीही लोकांची गर्दी होती. खव्वयेही विविध पदार्थांचा आस्वाद घेताना दिसत होते.