सोशल मीडियावर नियंत्रण राखणे कठीण

फिल्म्स डिव्हिजनचे महासंचालक मनीष देसाई यांचे चर्चासत्रात मत


27th November 2017, 03:49 am
प्रतिनिधी। गोवन वार्ता
पणजी : आजच्या डिजिटल युगात सोशल मीडियाचे स्वरूप पाहता त्यावर नियंत्रण राखणे कठीण असल्याचे मत फिल्म्स डिव्हिजनचे महासंचालक मनीष देसाई यांनी व्यक्त केले. आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात (इफ्फी) रविवारी आयोजित ‘सोशल मीडियाच्या जंजाळात माहितीपट ज्ञानाचा एकमेव खराखुरा स्रोत आहे का?' या विषयावरील चर्चासत्रात ते बोलत होते.
पत्र सूचना कार्यालयाचे उपसंचालक दीप जॉय मांपिल्ली, जेष्ठ पत्रकार सिराज सय्यद आणि पत्रकार प्राची पिंगळे चर्चासत्रात सहभागी झाले होते. ज्येष्ठ पत्रकार शाश्वत गुप्ता रे यांनी चर्चासत्राचे सूत्रसंचालन केले.
पत्रकार प्राची पिंगळे यांनीही देसाई यांच्या मताला दुजोरा दिला. सरकारतर्फे वृत्तपत्र, चित्रपट यातील मजकुरासंदर्भात नियंत्रण ठेवण्यासाठी विशेष यंत्रणा कार्यरत आहे. मात्र सोशल मीडियावरील नियंत्रणासंदर्भात अद्याप कुठलीही यंत्रणा नसल्याचे त्या म्हणाल्या. सोशल मीडियावरील मजकुराच्या विश्वासार्हता आणि जबाबदारीच्या अनुषंगाने भविष्यात लोकांनीच उपलब्ध पोस्ट, त्याचा हेतू आणि परिणाम याबाबत विचार करणे गरजेचे असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
जेष्ठ पत्रकार सिराज सय्यद यांनी जागतिक पातळीवरील संघटनेच्या माध्यमातून सोशल मीडियावर नियंत्रण राखता येऊ शकते, असे मत व्यक्त केले. तर सोशल मीडिया माध्यमात काम करताना उत्तम सादरीकरणासाठी चढाओढ सुरू असली, तरी सरकारकडून या माध्यमाचा वापर करताना मजकुराबाबत तडजोड केली जात नसल्याचे मत दीप जॉय मांपिल्ली यांनी व्यक्त केले.
  मनीष देसाई म्हणाले...
सोशल मीडियावरील मजकुराची विश्वासार्हता आणि जबाबदारी या दृष्टिकोनातून जनजागृती करणे गरजेचे आहे.
  केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयातर्फे सीबीएसईच्या अभ्यासक्रमात प्रसारमाध्यमांसंदर्भातील विषयाचा समावेश करण्याचा प्रयत्न असून, विविध राज्य सरकारांकडूनही असा प्रयत्न होणे गरजेचे आहे.
  माहितीपटांची केवळ निर्मिती होऊन चालणार नाही, तर ते प्रदर्शित करण्यासाठी अधिकाधिक उत्तम व्यासपीठ उपलब्ध होणे गरजेचे आहे.
  माहितीपटांना प्रोत्साहन देण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे. यासाठी फिल्म्स डिव्हिजन भारतीय माहितीपट निर्माता संघटनेच्या (आयडीपीए) सहकार्याने प्रयत्न करत आहे.
  माहितीपटासाठी निधी उपलब्ध करणे, दूरदर्शन वाहिनीवर स्वतंत्र स्लॉट उपलब्ध करणे, माहितीपटासाठी फेलोशिप सुरू करणे तसेच माहितीपटाच्या प्रदर्शनासाठी नवनवीन व्यासपीठांची निर्मिती करणे अशा प्रयत्नांचा यात समावेश आहे.