हाँगकाँग-सिंगापूरनंतर आता अमेरिकेतही भारतातील ब्रँडेड मसाले संकटात

भारतातील दोन ब्रँडेड कंपन्यांच्या मसाल्यांमध्ये कॅन्सरला पोषक रसायनांचा वापर केल्याचा दावा

Story: वेब डेस्क । गोवन वार्ता |
29th April, 09:46 am
हाँगकाँग-सिंगापूरनंतर आता अमेरिकेतही भारतातील ब्रँडेड मसाले संकटात

न्यूयॉर्क : भारत हा मसाल्यांचा देश. म्हणूनच भारतातून मोठ्या प्रमाणात मसाले निर्यात केले जातात. पण, भारतातील ब्रँडेड कंपन्यांच्या पॅकेटमधील मसाल्यांमध्ये कॅन्सरला खतपाणी घालणाऱ्या रसायनांचा वापर केल्याचे आढळून आल्याने सिंगापूर आणि हाँगकाँग या देशांनी गेल्याच आठवड्यात या मसाल्यांवर बंदी घातली आहे. आता अमेरिकेनेही गेल्या सहा महिन्यांपासून अशा ३१ टक्के मसाल्यांवर कारवाई केल्याचे समोर आले आहे. डिसेंबर २०२३ पासून अमेरिकेच्या अन्न सुरक्षा विभागाकडून असे मसाले स्वीकारण्यास नकार देण्यात आला आहे. 

हाँगकाँग-सिंगापूरमध्ये विक्रीवर बंदी का?

एका ब्रँडेड कंपनीच्या मद्रास करी पावडर, सांबार मसाला पावडर आणि करी पावडरच्या विक्रीवर हाँगकाँगमध्ये बंदी घालण्यात आली आहे. या मसाल्यांमध्ये धोकादायक कीटकनाशकांचा वापर केल्याचे तेथील तपासाता आढळून आल्याचा दावा करण्यात आला आहे. त्यानंतर आणखी एका ब्रँडच्या उत्पादनातही अशीच किटकनाशके वापरल्याचे आढळून आल्यानंतर त्यावर बंद घलण्यात आली आहे. 

कालांतराने सिंगापूरमध्येही याच ब्रँडेड मसाल्यांवर बंदी घालण्यात आली. त्यांनी केलेल्या तपासात कृषी उत्पादनांमध्ये कीटकनाशक म्हणून वापरल्या जाणाऱ्या इथिलीन ऑक्साईडचा वापर ब्रँडेड मसाल्यांमध्ये केल्याचे आढळून आले आहे. या रसायनामुळे कॅन्सरची बाधा होते, असा सिंगापूरच्या अन्न सुरक्षा विभागाचा दावा आहे. 

अमेरिकेच्या एफडीएनेही तपास सुरू केला

हाँगकाँग आणि सिंगापूरनंतर आता अमेरिकाही या मसाल्यांच्या ब्रँडबाबत अलर्ट मोडमध्ये आली आहे. एवढेच नाही तर मालदीवने या मसाल्यांच्या विक्रीवरही बंदी घातली आहे. यूएस फूड अँड ड्रग ॲडमिनिस्ट्रेशनने (एफडीए) भारतातील या ब्रँडेड मसाल्यांची तपासणी सुरू केली आहे.

एकामागून एक देशात या दोन भारतीय मसाल्यांच्या ब्रँडच्या अडचणी वाढत आहेत. तर दुसरीकडे हे आरोप बिनबुडाचे असल्याचे उत्तर दिले आहे. आमचे सर्व मसाले सुरक्षित आहेत आणि ते भारतीय मसाले मंडळाच्या प्रयोगशाळेकडून आवश्यक मंजुरी मिळाल्यानंतरच निर्यात केले जातात, असा दावा त्यांनी केला आहे.

हेही वाचा