विल जॅक्सचा वार; गुजरात टायटन्स गार

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा एकतर्फी विजय : विराट कोहलीचे शानदार अर्धशतक

Story: न्यूज डेस्क। गोवन वार्ता |
28th April, 11:58 pm
विल जॅक्सचा वार; गुजरात टायटन्स गार
हमदाबाद : आयपीएल २०२४ च्या ४५ व्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने गुजरात टायटन्सचा ९ गडी राखून पराभव केला. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात बंगळुरूला विजयासाठी २०१ धावांचे लक्ष्य होते, जे त्यांनी १६ षटकांत पूर्ण केले. 

आयपीएलमध्ये प्रथमच एका संघाने ९ विकेट्स शिल्लक असताना २०० हून अधिक धावांचा पाठलाग केला आहे. बंगळुरूचा चालू हंगामातील १० सामन्यांमधला हा तिसरा विजय होता आणि प्लेऑफमध्ये पोहोचण्याच्या त्यांच्या आशा अजूनही कायम आहेत. दुसरीकडे, गुजरात टायटन्सचा दहा सामन्यांमधला हा सहावा पराभव ठरला.

या सामन्यात विराट कोहली आणि विल जॅक्स आरसीबीच्या विजयाचे हिरो ठरले. इंग्लिश खेळाडू विल जॅक्सने अवघ्या ४१ चेंडूत शतक झळकावले. जॅक्सने १०० धावांच्या नाबाद खेळीत १० षटकार आणि ५ चौकार लगावले. तर कोहलीने नाबाद ७० धावा केल्या, ज्यात सहा चौकार आणि तीन षटकारांचा समावेश होता. कोहली आणि जॅक्समध्ये दुसऱ्या विकेटसाठी १६६ धावांची अभेद्य भागीदारी झाली. या भागीदारीने गुजरातकडून सामना हिसकावून घेतला.

तत्पूर्वी, नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजी करताना गुजरात टायटन्सने तीन गडी गमावून २०० धावा केल्या. गुजरातकडून साई सुदर्शनने ४९ चेंडूंत आठ चौकार आणि चार षटकारांसह नाबाद ८४ धावा केल्या. शाहरुख खाननेही ३० चेंडूंत ५८ धावांची उत्कृष्ट खेळी केली. शाहरुखच्या खेळीत तीन चौकार आणि पाच षटकारांचा समावेश होता. शाहरुख आणि सुदर्शन यांच्यात तिसऱ्या विकेटसाठी ८६ धावांची भागीदारी झाली, ज्यामुळे गुजरातला गती मिळाली. 

शाहरुख बाद झाल्यानंतर डेव्हिड मिलर आणि सुदर्शन यांच्यात चौथ्या विकेटसाठी नाबाद ६९ धावांची भागीदारी झाली. मिलरने १९ चेंडूंत दोन चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने २६ धावा केल्या. आरसीबीतर्फे स्वप्नील सिंग, ग्लेन मॅक्सवेल आणि मोहम्मद सिराज यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.