हैदराबादने ९.४ षटकांत केला लखनौचा खेळ खल्लास

हेड, अभिषेकची तुफानी फटकेबा​जी : ६२ चेंडू, १० गडी राखून विजय

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
09th May, 12:01 am
हैदराबादने ९.४ षटकांत केला लखनौचा खेळ खल्लास

हैदराबाद : इंडियन प्रीमियर लीग २०२४ च्या ५७ व्या सामन्यात सनरायझर्स हैदराबाद आणि लखनौ सुपर जायंट्स आमनेसामने होते. हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर हैदराबादने ६२ चेंडू शिल्लक ठेवून १० विकेट्सने सामना जिंकला. लखनौने फलंदाजी करताना २० षटकांत ४ गडी गमावून १६५ धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात हैदराबादने एकही विकेट न गमावता अवघ्या ९.४ षटकांत लक्ष्याचा पाठलाग केला.
हैदराबादकडून ट्रॅव्हिस हेड ३० चेंडूत ८९ धावा करून नाबाद परतला. त्याच्या बॅटमधून ८ चौकार आणि ८ षटकार आले. तर अभिषेक शर्मा २८ चेंडूत ७५ धावा करून नाबाद परतला. त्याने ८ चौकार आणि ६ षटकार मारले. लखनौविरुद्ध हैदराबादचा हा पहिला विजय आहे.नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना लखनौने २० षटकांत चार गडी गमावून १६५ धावा केल्या होत्या. एकवेळ लखनौने १२ व्या षटकात ६६ धावांत चार विकेट गमावल्या होत्या. यानंतर आयुष बडोनी आणि निकोलस पुरन यांनी ५२ चेंडूत ९९ धावांची नाबाद भागिदारी केली. त्यामुळे लखनौला १६५ धावसंख्येपर्यंत मजल मारण्यात यश आले. बडोनीने ३० चेंडूंत नऊ चौकारांच्या मदतीने नाबाद ५५ धावा केल्या. त्याचवेळी पुरनने २६ चेंडूंत सहा चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने ४८ धावांची नाबाद खेळी केली.
पूरन आणि बडोनी यांनी विशेषत: शेवटच्या ५ षटकांमध्ये हैदराबादच्या गोलंदाजांचा समाचार घेतला. पूरन आणि बडोनी यांनी शेवटच्या ५ षटकात ६३ धावा केल्या आणि ९९ धावांची भागीदारी करून लखनौला १६५ पर्यंत पोहोचवले. याव्यतिरिक्त लखनौकडून फलंदाजीत केएल राहुलने ३३ चेंडूत २९ तर कृणाल पांड्याने २१ चेंडूत २४ धावांची खेळी केली. क्विटंन डी-काॅक केवळ २ धावा काढून माघारी परतला.
हैदराबादकडून भुवनेश्वर कुमारने ४ षटकात १२ धावांत २ बळी घेतले तर पॅट कमिन्सने ४ षटकात ४७ धावा देत १ बळी घेतला. टी नटराजन सर्वात महागडा गोलंदाज ठरला. त्याने ४ षटकात एकही विकेट न घेता ५० धावा दिल्या.

माझे शब्द हरवले : के एल राहुल
अभिषेक शर्मा व ट्रॅव्हिस हेड यांनी पॉवर प्लेमध्ये हैदराबादने १०७ धावा चढवल्या. आयपीएलमध्ये हैदराबादने दुसऱ्यांचा पॉवर प्लेमध्ये १००+ धावा केल्या आणि असा पराक्रम करणारा तो पहिलाच संघ ठरला. यावर प्रतिक्रिया देताना लखनौचा कर्णधार के एल राहुल म्हणाला, माझे शब्द हरवले आहेत. आम्ही टीव्हीवर अशी फलंदाजी पाहिली आहे, पण ही अकल्पनीय फलंदाजी आहे. हैदराबादच्या फलंदाजांचे कौतुक करायला हवे. त्यांनी आपल्या सिक्स हिटींग कौशल्यावर मेहनत घेतली आहे. दुसऱ्या डावात खेळपट्टी कशी असेल हे त्यांनी आम्हाला जाणून घेण्याची संधी दिली नाही. त्यांना रोखणे कठीण होते, कारण ते पहिल्या बॉलपासून आक्रमण करत सुटले. एकदा तुम्ही पराभूत झालात की, घेतलेल्या निर्णयांवर प्रश्नचिन्ह उभे राहतात. आम्ही ४०-५० धावा कमी केल्या. पॉवरप्लेमध्ये आम्ही विकेट गमावल्यानंतर आम्हाला गती मिळू शकली नाही. आयुष आणि निकीने चांगली फलंदाजी करत आम्हाला १६५ पर्यंत पोहोचवले. पण आम्ही २४० धावा केल्या असत्या तरी त्यांना त्यांचा पाठलागही करता आला असता, असे तो म्हणाला.


आयपीएलमध्ये पॉवरप्लेमध्ये सर्वाधिक अर्धशतके
६ डेव्हिड वॉर्नर
४ ट्रॅव्हिस हेड - सर्व आयपीएल २०२४ मध्ये
३ सुनील नरेन
३ ख्रिस गेल


सर्वांत कमी चेंडूत १०० धावांची भागीदारी
३० हेड - अभिषेक शर्मा विरुद्ध दिल्ली २०२४
३४ टी हेड - अभिषेक शर्मा वि हैदराबाद २०२४ *
३६ हरभजन - जे सुचित विरुद्ध पुणे २०१५
३६ सी लिन - नरीन वि बेंगळुरू २०१७


आयपीएलमधील २० पेक्षा कमी चेंडूत अर्धशतके
३ जेक फ्रेझर-मॅकगर्क
३ ट्रॅव्हिस हेड *
२ सुनील नरिन
२ कायरन पोलार्ड
२ इशान किशन
२ केएल राहुल


आयपीएलमधील पहिल्या १० षटकांनंतरची सर्वोच्च धावसंख्या
१६७/० (९.४) हैदराबाद वि लखनौ, हैदराबाद २०२४ *
१५८/४ हैदराबाद वि दिल्ली, दिल्ली २०२४
१४८/२ हैदराबाद वि मुंबई, हैदराबाद २०२४
१४१/२ मुंबई वि हैदराबाद, हैदराबाद २०२४


आयपीएमध्ये जास्तीत जास्तीत जास्त चेंडू राखून विजय
६२ हैदराबाद वि लखनौ, हैदराबाद २०२४ (लक्ष्य: १६६) *
५७ दिल्ली वि पुणे ब्रेबॉर्न २०्२२ (लक्ष्य: ११६)
४८ डेक्कन वि मुंबई, नवी मुंबई २००८ (लक्ष्य: १५५)