दिल्लीच्या विजयाने रॉयल्स प्लेऑफमध्ये

लखनौ सुपर जायंट्स पराभूत : अभिषेक, ट्रिस्टनची अर्धशतके

Story: न्यूज डेस्क। गोवन वार्ता |
15th May, 12:01 am
दिल्लीच्या विजयाने रॉयल्स प्लेऑफमध्ये

नवी दिल्ली : दिल्ली कॅपिटल्सने आयपीएल २०२४च्या आपल्या अखेरच्या सामन्यात लखनौ सुपर जायंट्सचा १९ धावांनी पराभव केला. दिल्लीकडून इशांत शर्माने ३ बळी घेत संघाच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. 

प्रथम खेळताना दिल्लीने २०८ धावांची मजल मारली होती. या मोठ्या लक्ष्याचा पाठलाग करताना लखनौच्या फलंदाजांना मोठी भागीदारी करता आली नाही. लखनौकडून निकोलस पुरनने सर्वाधिक धावा केल्या. पूरनने २७ चेंडूंत ६१ धावांच्या तुफानी खेळीत ६ चौकार आणि ४ षटकार ठोकले. 

आयपीएल २०२४ मध्ये शतक झळकावणाऱ्या मार्कस स्टॉइनिसशिवाय कर्णधार केएल आणि इतर अनेक फलंदाज धावांच्या बाबतीत दुहेरी आकडाही गाठू शकले नाहीत. दिल्ली कॅपिटल्सकडून इशांत शर्मा, मुकेश कुमार आणि कुलदीप यादव यांनीही चांगली गोलंदाजी केली. 

तत्पूर्वी लखनौ सुपर जायंट्सने नाणेफेक जिंकून दिल्ली कॅपिटल्सला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले. लखनौचा कर्णधार केएल राहुलचा निर्णय योग्य ठरताना दिसत होता. दिल्लीला पहिला धक्का जेक फ्रेझर-मॅकगर्कच्या रूपाने फक्त दोन धावांवर बसला. लखनौचा गोलंदाज अर्शद खानने आपल्या संघाला चांगली सुरुवात करून दिली. मात्र त्यानंतर अभिषेक पोरेल आणि शाई होप यांनी चांगली भागीदारी करत संघाची धावसंख्या ९४ पर्यंत नेली. पण त्याच धावसंख्येवर शाई होपच्या रूपाने संघाला दुसरा धक्का बसला.

अभिषेक, ट्रिस्टनची अर्धशतके

अभिषेक पोरेल आणि ट्रिस्टन स्टब्स यांनी त्यांच्या संघासाठी अर्धशतके झळकावली. अभिषेकने ३३ चेंडूंचा सामना केला, ज्यात त्याने ५ चौकार आणि ४ षटकारांच्या मदतीने ५८ धावा केल्या. अभिषेकने होपसह दुसऱ्या विकेटसाठी ९२ धावांची भागीदारी केली. त्यानंतर ट्रिस्टन स्टब्सने नाबाद अर्धशतक झळकावले. त्याने अवघ्या २५ चेंडूत ३ चौकार आणि ४ षटकारांच्या मदतीने नाबाद ५७ धावा केल्या. कर्णधार ऋषभ पंतने २३ चेंडूंत ५ चौकारांच्या मदतीने ३३ धावांची खेळी केली. अक्षर पटेलने १० चेंडूंचा सामना केला, ज्यामध्ये त्याने २ चौकारांच्या मदतीने नाबाद १४ धावा केल्या.

अर्शद खान हा लखनौचा सर्वात महागडा गोलंदाज ठरला. त्याने १५ च्या सरासरीने धावा दिल्या. अर्शदने ३ षटकांत ४५ धावा देत एक विकेट घेतली. त्यानंतर युधवीर सिंगनेही १४ च्या सरासरीने धावा दिल्या. त्याने दोन षटके टाकली, ज्यामध्ये त्याने २८ धावा दिल्या आणि एकही विकेट घेऊ शकला नाही. नवीन उल हक हा लखनौचा सर्वात यशस्वी गोलंदाज ठरला. त्याने ४ षटकांत ५१ धावा देत २ बळी घेतले. लखनौकडून रवी बिश्नोईने एक विकेट घेतली. त्याने सर्वाधिक चांगली गोलंदाजी केली. बिश्नोईने ४ षटकांत केवळ २६ धावा दिल्या.

या विजयासह, दिल्लीचे १४ गुण झाले आहेत, परंतु खराब नेट रन-रेटमुळे, दिल्लीची प्लेऑफमध्ये जाण्याची शक्यता फारच कमी दिसते. पण लखनौच्या पराभवामुळे राजस्थान रॉयल्स प्लेऑफसाठी पात्र ठरली आहे.

हेही वाचा