चिराग चिक्कारा बनला कुस्तीत जागतिक चॅम्पियन

२३ वर्षांखालील गटात ठरला केवळ तिसरा भारतीय कुस्तीपटू

Story: न्यूज डेस्क। गोवन वार्ता |
28th October 2024, 10:11 pm
चिराग चिक्कारा बनला कुस्तीत जागतिक चॅम्पियन

तिराना : चिराग चिक्कारा २३ वर्षांखालील जागतिक चॅम्पियन बनणारा तिसरा भारतीय कुस्तीपटू ठरला आहे. त्याने अल्बानिया येथे सुरू असलेल्या वयोगट स्पर्धेत भारताला एक सुवर्ण आणि रौप्य पदक जिंकून दिली. 

पुरुषांच्या फ्रीस्टाइल ५७ किलो वजनी गटात चिक्काराने शेवटच्या सेकंदात किर्गिस्तानच्या अब्दिमालिक कराचाववर ४-३ असा विजय मिळवला. पॅरिस ऑलिम्पिकमधील कांस्यपदक विजेता अमन सेहरावतनंतर २३ वर्षांखालील चॅम्पियनशिपमध्ये सुवर्णपदक जिंकणारा तो दुसरा भारतीय पुरुष खेळाडू ठरला आहे.

चिक्काराने अंतिम फेरी गाठण्यापूर्वी प्रभावी कामगिरी केली. त्याने प्री-क्वार्टर फायनलमध्ये गौकोटो ओझावाचा ६-१, शेवटच्या आठ टप्प्यात युनस एव्हबॅटिरोव्हचा १२-२ आणि उपांत्य फेरीमध्ये अॅलन ओरलबेकचा ८-० असा पराभव केला.

भारताच्या पदकतालिकेत पुरुषांच्या फ्रीस्टाइल प्रकारातील दोन कांस्यपदकांचाही समावेश आहे. यासह ते सांघिक गुणतक्त्यात ८२ गुणांसह चौथ्या स्थानावर असून इराण (१५८), जपान (१०२) आणि अझरबैजान (१००) यांच्या मागे आहे. 

पुरुषांच्या फ्रीस्टाइलमध्ये भारताने आणखी दोन कांस्यपदके जिंकली आणि या प्रकारात देशाच्या पदकांची संख्या चार झाली. विकीने पुरुषांच्या ९७ किलो फ्रीस्टाइल स्पर्धेत अंडर-२० वर्ल्ड चॅम्पियनशिप रौप्यपदक विजेता आणि युक्रेनच्या युरोपियन ज्युनियर चॅम्पियन इव्हान प्रिमाचेन्कोचा ७-२ असा पराभव करून कांस्यपदक जिंकले.

विकीने पहिल्या फेरीत जॉर्जियाच्या मेराब सुलेमानिशविलीचा आणि उपांत्यपूर्व फेरीत मोल्दोव्हाच्या राडू लेफ्टरचा पराभव केला होता परंतु उपांत्य फेरीत त्याला इराणच्या महदी हझिलोयन मोराफाकडून पराभव पत्करावा लागला होता. पुरुषांच्या ७० किलो फ्रीस्टाइलमध्ये सुजित कलकलने ०-४ ने पिछाडीवरून पुनरागमन केले आणि ताजिकिस्तानच्या मुस्ताफो अखमेदोव्हचा १३-४ असा पराभव करून कांस्यपदक जिंकले.