बार्देश : कांदोळीत धावत्या कारला लागली आग; सुदैवाने जीवितहानी नाही

बचावकार्यात गुंतलेल्या अग्निशमन दलाच्या जवानाचा फोन चोरला

Story: वेब डेस्क । गोवन वार्ता |
31st October 2024, 10:29 pm
बार्देश : कांदोळीत धावत्या कारला लागली आग; सुदैवाने जीवितहानी नाही

म्हापसा : कांदोळी येथील गणपती मंदिरानजीक धावत्या कारला आग लागली. या आगीत टॅक्सी जळून खाक झाल़्याने अंदाजे ५ लाखांचे नुकसान झाले. विशेष म्हणजे ही आग विझवण्याच्या कामात गुंतलेल्या अग्निशमन दलाच्या जवानाचा मोबाईल फोन चोरीस गेला.  ही घटना गुरूवारी ३१  रोजी दुपारी ३.१५ च्या सुमारास घडली. कार चालक राफायल पिटर फर्नांडिस हे आपली जीए ०३ डब्लू ६२०१ क्रमांकाची टोयोटा ईटीऑस ही टॅक्सी घेऊन जात होते. यावेळी गणपती मंदिराजवळ कार पोहोचताच अचानक इंजिनमध्ये  व लगेच आगीने पेट घेतला. 



प्रसंगावधाने कार चालकाने गाडीतून बाहेर धाव घेतली व अग्निशमन दलाला माहिती दिली. पिळर्ण अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी दाखल होत आग नियंत्रणात आणली. मात्र तो पर्यंत संपुर्ण कार जळून खाक झाली होती. दलाचे उपअधिकारी सनी पायदे यांच्या नेतृत्वाखाली दलाचे विशाल पाटील, साईश च्यारी, स्वप्नील नाईक, एस. सावंत, जितेंद्र बली व एस. मांद्रेकर यांनी ही आग विझवली. 


  दरम्यान, आग विझवताना पाण्यामुळे मोबाईल भिजू नये म्हणून अग्निशमन दलाचे जवान विशाल पाटील यांनी आपला फोन गाडीतच ठेवला होता. अग्निशमन दलाचे जवान कारला लागलेली आग  नियंत्रणात आणण्याच्या कामात व्यस्त असल्याचे पाहून अज्ञात चोराने हा मोबाईल फोन गाडीत चढून चोरला. हा प्रकार नंतर निदर्शनास आल्यावर पाटील यांनी कळंगुट पोलिसांत तक्रार दाखल केली. पुढील तपास पोलीस करीत आहेत.

हेही वाचा