आयपीएलमधील १० संघांनी अनेक पैलूंवर गंभीर विचार करत निर्णय घेतल्याचे एकंदरीत लिस्टवरुन दिसत आहे. मात्र चाहत्यांना धक्का देणारे निर्णयही अनेक संघांनी घेतले आहेत.
मुंबई : सर्व १० संघांनी आयपीएलच्या आगामी लिलावासाठी रिटेन्शन लिस्ट जाहीर केली आहे. ५ वेळचे चॅम्पियन चेन्नई सुपर किंग्सने ५ खेळाडूंना कायम ठेवले आहे. माजी कर्णधार एमएस धोनी चेन्नईकडून अनकॅप्ड खेळाडू म्हणून खेळणार आहे.
त्याचवेळी दिल्ली कॅपिटल्सने कर्णधार ऋषभ पंतला सोडले असून आता तो लिलावात उतरणार आहे. पंत २०१६पासून दिल्लीसोबत होता आणि २०२२ मध्ये तो या फ्रँचायझीचा कर्णधारही झाला. लखनौ सुपर जायंट्सने केएल राहुलला रिलीज केले आहे आणि कोलकाता नाइट रायडर्सने (केकेआर) कर्णधार श्रेयस अय्यरला रिलीज केले आहे.
हेनरिक क्लासेन हा सर्वात महाग रिटेनर आहे. सनरायझर्स हैदराबादने त्याला २३ कोटी रुपयांमध्ये आपल्या संघात कायम ठेवले.
वाचा कोणत्या फ्रँचायझींनी कोणते खेळाडू केले रिटेन
१ ) रशीद, गिलसह ५ खेळाडूंना गुजरातने कायम ठेवले
गुजरात टायटन्सने पाच खेळाडूंना कायम ठेवले असून यापैकी तीन कॅप्ड आणि दोन कॅप्ड आहेत. गुजरातने राशिद खान, शुभमन गिल आणि साई सुदर्शनला कॅप्ड म्हणून कायम ठेवले. राहुल तेवतिया आणि शाहरुख खान हे दोन अनकॅप्ड खेळाडू आहेत. आता लिलावात गुजरातला राईट टू मॅच कार्डसह कॅप्ड खेळाडू घेण्याची संधी मिळणार आहे.
२) आश्विन, बटलरसह चहलला राजस्थान रॉयल्सने केले रिलीज
राजस्थान रॉयल्सने संजू सॅमसन, यशस्वी जैस्वाल, रियान पराग, ध्रुव जुरेल आणि शिमरोन हेटमायर या पाच खेळाडूंना रिटेन केले आहे. त्याचबरोबर संदीप शर्माला अनकॅप्ड खेळाडू म्हणून कायम ठेवण्यात आले आहे. आता संघाला लिलावात राईट टू मॅच कार्ड वापरण्याची संधी मिळणार नाही. आर आरने त्याचे स्टार खेळाडू जोस बटलर, युझवेंद्र चहल आणि रविचंद्रन अश्विन यांना रिलीज केले आहे.
३) दिल्लीने केले ऋषभला रिलीज
दिल्ली कॅपिटल्सने (DC) कर्णधार ऋषभ पंतला रिलीज केले आहे. संघाने अक्षर पटेल, कुलदीप यादव, ट्रिस्टन स्टब्स आणि अभिषेक पोरेल यांना कायम ठेवले आहे. त्यात एक पोरेल अनकॅप्ड आहे.
४) लखनौने के एल राहुलला दिला डच्चू
एलएसजीनेही पाच खेळाडूंना कायम ठेवले आहे. यामध्ये निकोलस पुरन, मयंक यादव, आयुष बडोनी, मोहसिन खान आणि रवी बिश्नोई यांचा समावेश आहे. पुरण, मयंक आणि बिश्नोई हे कॅप्ड खेळाडू आहेत, तर मोहसिन आणि बडोनी हे अनकॅप्ड खेळाडू आहेत.
५) श्रेयशच्या हाती नारळ; कोलकाता नारायण-रसेल भोवती बांधणार संघाची मोट
कोलकाता नाईट रायडर्सने (KKR) कर्णधार श्रेयस अय्यरला रिलीज केले आहे. केकेआरने आंद्रे रसेल, सुनील नरेन, रिंकू सिंग आणि वरुण चक्रवर्ती या चार कॅप्ड खेळाडूंना आणि रमणदीप सिंग आणि हर्षित राणा यांच्या रूपात दोन अनकॅप्ड खेळाडूंना कायम ठेवले आहे.
६) हैदराबादचा बॅलन्सवर भर
सनरायझर्स हैदराबादने पाच खेळाडूंना कायम ठेवले आहे. सर्व कॅप्ड खेळाडू आहेत. यामध्ये कर्णधार पॅट कमिन्स, ट्रॅव्हिस हेड, हेनरिक क्लासेन, नितीश कुमार रेड्डी आणि अभिषेक शर्मा यांचा समावेश आहे. लिलावात त्यांना राईट टू मॅच कार्डसह अनकॅप्ड खेळाडू घेण्याची संधी मिळेल.
७) सिराजला रिलीज करत आरसीबीचा चाहत्यांना धक्का
दरम्यान बंगळुरूने डू प्लेसिस, मॅक्सवेल आणि सिराजला रिलीज केले असून पाटीदार, दयाल आणि कोहलीला रिटेन केले आहे. विराट कोहलीसाठी २१ कोटी किंमत मोजण्यात आली असून यंदा तोच बंगळुरू संघाचे कर्णधारपद सांभाळणार आहे.
८) पंजाबने केवळ दोन खेळाडूंना कायम ठेवले
पंजाब किंग्सने (पीबीकेएस) केवळ दोन खेळाडूंना कायम ठेवले आहे. पंजाबने प्रभसिमरन सिंग आणि शशांक सिंगला कायम ठेवले आहे. हे दोन्ही खेळाडू अनकॅप्ड आहेत.
९) धोनी अनकॅप्ड खेळाडू म्हणून कायम आहे
५ वेळा चॅम्पियन बनलेल्या चेन्नई सुपर किंग्सने ५ खेळाडूंना कायम ठेवले आहे, यामध्ये माजी कर्णधार एमएस धोनी (अनकॅप्ड), कर्णधार रुतुराज गायकवाड, रवींद्र जडेजा, शिवम दुबे आणि श्रीलंकेचा वेगवान गोलंदाज मथिश पाथिराना यांचा समावेश आहे.
१०) मुंबई इंडियन्सने ५ खेळाडूंना रिटेन केले
५ वेळा विजेतेपद पटकावणाऱ्या मुंबई इंडियन्सने फ्रँचायझी कर्णधार हार्दिक पांड्या, जसप्रीत बुमराह, सूर्यकुमार, रोहित शर्मा आणि तिलक वर्मा यांना कायम ठेवले आहे.