भारतीय क्रिकेटपटूंसाठी नवीन 'ब्रोंको' चाचणी अनिवार्य

तंदुरुस्तीचा स्तर उंचावण्याचा उद्देश : बंगळुरूमधील सेंटर ऑफ एक्सलन्समध्ये चाचणीला सुरुवात

Story: न्यूज डेस्क। गोवन वार्ता |
21st August, 11:34 pm
भारतीय क्रिकेटपटूंसाठी नवीन 'ब्रोंको' चाचणी अनिवार्य

बंगळुरू : भारतीय क्रिकेटपटूंचा तंदुरुस्तीचा स्तर आणखी उंचावण्यासाठी मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर आणि कंडिशनिंग प्रशिक्षक एड्रियन ले रॉक्स यांनी एक नवीन 'ब्रोंको' चाचणी सुरू केली आहे. ही चाचणी आता यो-यो चाचणी आणि २ किलोमीटर धावण्याच्या चाचणीसोबत खेळाडूंच्या तंदुरुस्तीचा तिसरा निकष असेल. बंगळुरूमधील बीसीसीआयच्या सेंटर ऑफ एक्सलन्स येथे या चाचणीला सुरुवात झाली असून, काही काही वरिष्ठ खेळाडूंनीही तिथे जाऊन चाचणी दिली. इंग्लंडविरुद्ध झालेल्या ५ कसोटी सामन्यांच्या मालिकेनंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. ‍
इंग्लंडच्या दौऱ्यात भारतीय संघाने इंग्लंडसोबत ५ कसोटी सामन्यांच्या मालिकेत २-२ अशी बरोबरी केली. पण, यावेळी खेळाडूंचा फिटनेस हा चर्चेचा विषय ठरला आहे. मालिकेमध्ये भारताचा स्टार गोलंदाज जसप्रीत बुमराह, आकाशदीप यांना फिटनेसमुळे अनेकदा अडचणींचा सामना करावा लागला. भारतीय खेळाडूंचा फिटनेस तपासण्यासाठी यो यो ही टेस्ट केली जात होती, पण तरीही खेळाडूंच्या फिटनेसची चिंता सतावत आहे. हे सर्व धोके टाळण्यासाठी आता भारतीय संघाच्या व्यवस्थापनाने नवीन ब्रोंको टेस्ट घेण्याचे ठरविले आहे.
जलदगती गोलंदाजांची तंदुरुस्ती वाढवण्यावर भर
इंग्लंडविरुद्धच्या ५ कसोटी सामन्यांच्या मालिकेत फक्त मोहम्मद सिराज हा एकमेव जलदगती गोलंदाज होता, ज्याने सर्व ५ सामन्यांमध्ये भाग घेतला. यामुळे जलदगती गोलंदाजांच्या तंदुरुस्तीबाबत चिंता वाढली. इंग्लंड दौऱ्यानंतर ले रॉक्स यांनी ब्रोंको चाचणीचा प्रस्ताव दिला, ज्याला गौतम गंभीर यांनी लगेच पाठिंबा दिला. या चाचणीमुळे जलदगती गोलंदाजांची धावण्याची क्षमता आणि एकूण तंदुरुस्ती वाढण्यास मदत होईल अशी अपेक्षा आहे.
काय आहे ब्रोंको चाचणी?
- पारंपरिकपणे रग्बी खेळात वापरली जाणारी ही ब्रोंको चाचणी खेळाडूंची शारीरिक क्षमता तपासण्यासाठी अत्यंत प्रभावी मानली जाते.
- या चाचणीमध्ये खेळाडूला २० मीटर, ४० मीटर आणि ६० मीटर शटल धाव पूर्ण करावी लागते.
- या तिन्ही धावांचा एक संच तयार होतो. खेळाडूला न थांबता असे ५ संच पूर्ण करावे लागतात.
- यासाठी ६ मिनिटांची वेळमर्यादा असून, या काळात खेळाडूला सुमारे १२०० मीटर धावणे अपेक्षित आहे.