‘सरपंच’ हरमनप्रीतची शानदार हॅट्ट्रिक; चीनचा ४-३ ने पराभव
राजगीर : हॉकी आशिया कप २०२५ स्पर्धेचा शानदार प्रारंभ शुक्रवारी बिहारमधील ऐतिहासिक राजगीर येथे झाला. राज्याचे मुख्यमंत्री नीतीश कुमार यांच्या हस्ते या स्पर्धेच्या ट्रॉफीचे अनावरण करण्यात आले. यजमान भारताने आपल्या पहिल्याच सामन्यात चीनवर ४-३ असा निसटता पण महत्त्वपूर्ण विजय मिळवत विजयी सलामी दिली. भारताचा कर्णधार आणि ‘सरपंच साहेब’ म्हणून ओळखला जाणारा हरमनप्रीत सिंग हा सामन्याचा हिरो ठरला. त्याने शानदार हॅट्ट्रिक नोंदवत भारताच्या विजयाची घोडदौड पुढे नेली.
हा सामना खऱ्या अर्थाने प्रेक्षकांसाठी रोमांचकारी ठरला. शेवटच्या क्षणापर्यंत दोन्ही संघांनी प्रेक्षकांना त्यांच्या आसनांवर खिळवून ठेवले. सामन्याच्या सुरुवातीला भारताने जोरदार आक्रमण करत चेंडू जाळ्यात धाडला होता, मात्र तिसऱ्या पंचाचा सल्ला घेतल्यानंतर तो फाऊल ठरला. या संधीचा फायदा घेत चीनच्या डू शिहाओने ड्रॅग फ्लिकवर अप्रतिम गोल करत १-० अशी आघाडी मिळवून दिली. भारताने पहिल्या क्वार्टरमध्ये पिछाडी पत्करली असली, तरी दुसऱ्या क्वार्टरमध्ये त्यांनी जोरदार पुनरागमन केले. हरमनप्रीत सिंग आणि जुगराज सिंग यांनी प्रत्येकी एक गोल करत अर्ध्या वेळेपर्यंत भारताला २-१ अशी आघाडी मिळवून दिली.
तिसऱ्या क्वार्टरमध्ये भारताने आघाडी ३-१ अशी मजबूत केली. पण चीननेही झुंजार खेळ दाखवत जोरदार पुनरागमन केले. चीनकडून चेन बेनहाई आणि गाओ जियेशेंग यांनी प्रत्येकी एक गोल करत सामना ३-३ असा रंगतदार केला. भारताकडून या क्वार्टरमध्ये पुन्हा हरमनप्रीतने गोल नोंदवला होता. निर्णायक चौथ्या क्वार्टरमध्ये भारताचा कर्णधार हरमनप्रीत पुन्हा एकदा आक्रमक पवित्रा घेऊन उतरला. त्याने अप्रतिम ड्रॅग फ्लिकवर स्वतःचा तिसरा व भारतासाठी चौथा गोल करत हॅट्ट्रिक पूर्ण केली. उरलेल्या वेळेत चीनकडून अनेक प्रतिहल्ले झाले, मात्र भारतीय बचावपटूंनी खंबीर खेळ करत विजय निश्चित केला. विशेष म्हणजे, या सामन्यातील सर्व सातही गोल ड्रॅग फ्लिकवरूनच झाले, ही बाब क्वचितच पाहायला मिळते.
गटवारी, पुढील लढती
स्पर्धेत भारताचा समावेश ग्रुप ‘ए’ मध्ये असून त्याच्यासोबत चीन, जपान आणि कझाकस्तान हे संघ आहेत. तर ग्रुप ‘बी’ मध्ये पाच वेळा विजेतेपद पटकावलेला दक्षिण कोरिया, मलेशिया, बांगलादेश आणि चीनी तैपेई हे संघ आहेत. भारतीय संघाने पहिल्या विजयासह गटात आपली दावेदारी ठामपणे नोंदवली आहे. हरमनप्रीत सिंगच्या शानदार कामगिरीमुळे संघाचे मनोबल उंचावले असून पुढील लढतींसाठी भारतीय चाहत्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.