रोहित-विराटवर निवृत्तीसाठी दबाव नाही : राजीव शुक्ला

फेअरवेल सामना वेळ आल्यावरच : निवृत्तीचा निर्णय खेळाडूंचाच

Story: न्यूज डेस्क । गोवन वार्ता |
24th August, 12:02 am
रोहित-विराटवर निवृत्तीसाठी दबाव नाही : राजीव शुक्ला

मुंबई : विराट आणि रोहित अजूनही उत्कृष्ट खेळ करत आहेत. त्यांनी निवृत्तीची कोणतीही घोषणा केलेली नाही. त्यामुळे फेअरवेल सामन्याबाबत बोलण्याची वेळच आलेली नाही. बीसीसीआय कधीच कोणत्याही खेळाडूला जबरदस्ती निवृत्ती घेण्यास सांगत नाही. खेळाडूंनी स्वतः निर्णय घ्यायचा असतो आणि आम्ही त्याचा सन्मान करतो, असे बीसीसीआयचे वरिष्ठ पदाधिकारी राजीव शुक्ला म्हणाले.

विराट कोहली आणि रोहित शर्मा यांच्या निवृत्तीबाबत गेल्या काही दिवसांपासून जोरदार चर्चा सुरू आहे. कसोटी आणि टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर आता या दोघांचा पुढचा टप्पा वनडे क्रिकेट असणार का? हा प्रश्न क्रिकेटप्रेमींच्या मनात आहे. याबाबतच शुक्ला यांनी चर्चेला पूर्णविराम दिला आहे. यूपी टी-२० लीगदरम्यान पत्रकारांनी राजीव शुक्लांना या दोन्ही खेळाडूंच्या निवृत्तीबाबत विचारले. त्यावर त्यांनी प्रतिक्रिया दिली.

त्यांच्या या विधानामुळे स्पष्ट होते की, विराट आणि रोहित यांना अजूनही भारतीय संघात महत्त्वाची भूमिका बजावायची आहे. विराट आणि रोहितने इंग्लंड दौऱ्यावर रवाना होण्यापूर्वी इन्स्टाग्राम स्टोरीद्वारे कसोटी क्रिकेटला अलविदा केल्याची घोषणा केली होती. त्याआधी आयसीसी टी-२० वर्ल्डकपनंतर या दोघांनी एकत्रितपणे टी-२० क्रिकेटमधून निवृत्ती घेतली होती. त्यामुळे आता चाहत्यांमध्ये चर्चेला उधाण आले होते की हे दिग्गज वनडे क्रिकेटमधूनही लवकरच निवृत्त होणार का?

२०२७ चा वर्ल्डकप खेळणार

या घडामोडींवरून दिसून येते की, विराट कोहली आणि रोहित शर्मा दोघेही आगामी २०२७ च्या वनडे वर्ल्डकप स्पर्धेत भारतीय संघासाठी खेळताना दिसतील. दोघांची फिटनेस, अनुभव आणि फॉर्म पाहता बीसीसीआय त्यांना संघाचा कणा मानत आहे.

२०२७ वर्ल्डकपनंतर निवृत्ती

क्रिकेट विश्वचषक २०२७ दक्षिण आफ्रिका, नामिबिया आणि झिंबाब्वे येथे होणार आहे. असे म्हटले जात आहे की, विराट आणि रोहित या स्पर्धेनंतर आपली वनडे क्रिकेट कारकीर्द संपवू शकतात. मात्र काहींच्या मते ते याआधीही निर्णय घेऊ शकतात. काही दिवसांपासून सोशल मीडियावर चाहत्यांमध्ये या दोघांच्या फेअरवेल सामन्याबद्दल उत्सुकता होती. विशेषतः महेंद्रसिंह धोनीनंतर मोठ्या खेळाडूंच्या निरोपाबाबत बरीच चर्चा झाली होती. मात्र बीसीसीआयने आता हे स्पष्ट केले आहे की योग्य वेळ आल्यावरच फेअरवेलबाबत निर्णय घेतला जाईल.

दरम्यान, आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ स्पर्धेनंतर भारतीय संघ एकही वनडे मालिका खेळण्यासाठी मैदानात उतरलेला नाही. १९ ऑक्टोबरपासून रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ ऑस्ट्रेलियाविरूद्ध वनडे मालिका खेळण्यासाठी मैदानात उतरणार आहे. या सामन्यासाठी भारतीय संघात मोठे बदल पाहायला मिळू शकतात.

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात होणाऱ्या वनडे मालिकेतील पहिला सामना १९ ऑक्टोबरला तर दुसरा सामना २३ ऑक्टोबरला आणि तिसरा सामना २५ ऑक्टोबरला खेळवला जाणार आहे. विराट कोहली आणि रोहित शर्मा हे दोघेही या मालिकेतून पुनरागमन करताना दिसून येणार आहेत. विराट आणि रोहित दोघेही वनडे क्रिकेटमधून निवृत्ती घेणार असल्याची चर्चा सुरू आहे. त्यामुळे विराट आणि रोहित ही मालिका खेळणार की नाही? अशी चर्चा रंगायला सुरूवात झाली आहे.

वनडे संघाचे कर्णधारपद रोहित शर्माकडे आहे. युवा फलंदाज शुबमन गिल हा वनडे संघाचा उपकर्णधार आहे. शुभमन गिलला या मालिकेतून विश्रांती दिली जाऊ शकते. शुभमन गिलची आशिया चषकासाठी भारतीय टी-२० संघाच्या उपकर्णधारपदी निवड करण्यात आली आहे. त्याच्या कामाचा ताण कमी करण्यासाठी त्याला विश्रांती दिली जाऊ शकते.

गिलला विश्रांती दिल्यामुळे यशस्वी जैस्वालचे वनडे संघात पुनरागमन करण्याचे दार उघडणार आहे. जैस्वाल आणि रोहित ही जोडी ऑस्ट्रेलियात डावाची सुरूवात करताना दिसून येऊ शकते. तर ऋषभ पंतच्या जागी यष्टीरक्षक फलंदाज म्हणून केएल राहुलला संधी दिली जाऊ शकते. विराट कोहली, श्रेयस अय्यर आणि केएल राहुल हे मधल्या फळीत फलंदाजी करताना दिसू शकतात. या संघात अष्टपैलू खेळाडू म्हणून हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा आणि अक्षर पटेल यांना संधी दिली जाऊ शकते. तर फिरकी गोलंदाज म्हणून कुलदीप यादव, वरूण चक्रवर्ती यांना संधी दिली जाऊ शकते. तर वेगवान गोलंदाज म्हणून जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी आणि मोहम्मद सिराज यांना संधी मिळण्याची शक्यता वर्तविली जात आहे.