डिसेंबरमध्ये मुंबई, कोलकातासह चार शहरांना देणार भेट
मुंबई : अर्जेंटिनाचा विश्वविजेता फुटबॉलपटू लिओनेल मेस्सी डिसेंबर २०२५ मध्ये भारत दौऱ्यावर येणार असल्याची अधिकृत घोषणा आयोजक सताद्रु दत्ता यांनी केली आहे. केरळ दौरा रद्द झाल्यामुळे चाहत्यांच्या निराशेत भर पडली होती, मात्र आता मेस्सीला भारतात प्रत्यक्ष पाहण्याची संधी मिळणार आहे.
स्पर्धात्मक सामना खेळण्यासाठी नसला तरी विविध कार्यक्रम, कॉन्सर्ट्स आणि खास ‘गोट टूर ऑफ इंडिया २०२५’ अंतर्गत चाहत्यांशी संवाद साधण्यासाठी मेस्सी भारतात दाखल होणार आहे.
दौऱ्याची १२ डिसेंबर रोजी सुरुवात कोलकातामध्ये होणार आहे. मेस्सी दोन दिवस या शहरात थांबेल. त्याच्या स्वागतासाठी कोलकात्यातील खास पारंपरिक खाद्यपदार्थांची मेजवानी आयोजित केली जाईल. यावेळी मेस्सीच्या पुतळ्याचे अनावरण होणार आहे. याचबरोबर ‘गोट कॉन्सर्ट’ आणि ‘गोट चषक’ या दोन मुख्य कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. ‘गोट चषक’ लढतीत मेसी सोबत सौरव गांगुली, लिअँडर पेस, जॉन अब्राहम, बायचुंग भुतिया यांसह सातसदस्यीय फुटबॉल सामना खेळला जाणार आहे.
१३ डिसेंबर रोजी सायंकाळी मेसी अहमदाबाद गाठेल. अदानी फाउंडेशनच्या वतीने विशेष कार्यक्रम आयोजित केला जाईल. १४ डिसेंबर रोजी ब्रेबॉर्न स्टेडियमवर मेस्सी चाहत्यांना भेटणार. वानखेडेवर ‘गोट कॉन्सर्ट’ आणि ‘गोट चषक’ आयोजित होणार आहे. मेस्सीला ‘पॅडल’ खेळाची आवड असल्याने शाहरुख खान आणि लिअँडर पेस सोबत काही मिनिटे हा खेळ खेळण्याची शक्यता आहे. ‘गोट कॉन्सर्ट’ कार्यक्रमात सचिन तेंडुलकर, महेंद्रसिंह धोनी, रोहित शर्मा, रणवीर सिंग, आमीर खान, टायगर श्रॉफ यांचा सहभाग असणार आहे. १५ डिसेंबर रोजी फिरोज शाह कोटला स्टेडियमवर ‘गोट कॉन्सर्ट’ आणि ‘गोट चषक’ होणार असून यामध्ये विराट कोहली आणि शुभमन गिल सहभागी होण्याची शक्यता आहे. या कार्यक्रमाआधी मेस्सी पंतप्रधान नरेंद्र मोदींना भेटणार आहे. याच भेटीने त्याच्या भारत दौऱ्याची सांगता होणार.
मेस्सी याआधी २०११ मध्ये भारतात आला होता. त्यावेळी कोलकात्याच्या सॉल्ट लेक स्टेडियमवर अर्जेंटिनाने व्हेनेझुएलाविरुद्ध मैत्रीपूर्ण सामना खेळला होता. यंदा मेस्सीसोबत त्याचे इंटर मियामी सहकारी रॉड्रिगो डी पॉल, लुइस सुआरेझ, जॉर्डी अल्बा, सर्जिओ बुसकेट्स हे देखील भारतात येऊ शकतात, अशी चर्चा आहे.
चाहत्यांमध्ये उत्सुकता
भारतात फुटबॉलवेड्या चाहत्यांची संख्या प्रचंड आहे. क्रिकेटसोबत फुटबॉललाही मोठे चाहते मिळाले असून, ‘गोट टूर ऑफ इंडिया २०२५’ मुळे हा उत्साह शिगेला पोहोचेल यात शंका नाही. मेस्सीसारखा महानायक भारतीय चाहत्यांसोबत थेट संवाद साधणार असल्याने तिकिटांसाठी प्रचंड मागणी होण्याची शक्यता आहे. एकंदरीत, डिसेंबरमध्ये होणारा हा दौरा भारतीय क्रीडाप्रेमींसाठी ऐतिहासिक ठरणार असून, मेस्सीचा करिष्मा आणि भारतातील क्रिकेट-फुटबॉल स्टार्सचा सहभाग यामुळे या कार्यक्रमांची भव्यता आणखी वाढणार आहे.