पर्यटन आणि आयटी मंत्री रोहन खंवटे यांची मुलाखत घेण्याची संधी आकाशवाणीवर लाभली. खंवटे यांच्याकडे दोन खाती आहेत. दोन्ही खात्यांच्या कार्याविषयी व त्यांच्या नियोजनाविषयी प्रश्न विचारणं भाग होतं. ते दोन्ही संतुलित प्रमाणात होणं गरजेचं होतं.
मंत्री रोहन खंवटे यांच्याकडे ओघवतं वक्तृत्व आहे. त्यांच्या अखत्यारीतील घटकांची आकडेवारी त्यांना तोंडपाठ आहे. हातात काहीही कागद नसताना त्यांनी धाड धाड सगळी माहिती प्रवाही शैलीत सांगितली. पर्यटनाची आव्हाने, बीच पर्यटना पल्याड जाऊन इतर पर्यटन संधींचा शोध, पर्यटकांची सुविधा, ग्रामीण भागावर भर, आध्यात्मिक पर्यटन अशा विविध बाबींवर त्यांनी सविस्तर तपशील सांगितला. पर्यटनाचा विस्तार करताना शासनाला कोणकोणती काळजी घ्यावी लागते ते सांगितले. गोवा पर्यटन म्हणजे फक्त समुद्रकिनारे ही संकुचित संकल्पना दूर सारून राज्याच्या पर्यटन परिदृश्याचा कायापालट करण्याचे स्वप्न आपल्या दूरदृष्टीच्या नेतृत्वाने पर्यटन मंत्री श्री रोहन खंवटे यांनी उराशी बाळगले आहे हे जाणवले.
गोवा पर्यटन म्हणजे फक्त समुद्रकिनारे ही संकुचित संकल्पना दूर सारून राज्याच्या पर्यटन परिदृश्याचा कायापालट करण्याचे स्वप्न सरकारने उराशी बाळगले आहे त्या विषयी मंत्री श्री रोहन खंवटे यांनी सांगितले. पर्यटकांसाठी आध्यात्मिक अनुभव समृद्ध करणे हा सरकारचा उद्देश आहे, असे सांगताना, टेंपल कनेक्टसारखे उपक्रम सुरू केले आहेत. मंदिरांना डायस्पोरा, विशेषत: जे दूरस्थपणे पूजा करू इच्छितात त्यांना जोडणारे एक आभासी व्यासपीठ योजिले आहे. इको-टूरिझमवरही भर आहे. यामध्ये पर्यावरण स्नेही कुटिरामध्ये मुक्काम, स्थानिक समुदायांशी संवाद, स्थानिक खाद्यपदार्थांमध्ये रमणे आणि हिरव्यागार जंगलांमध्ये ट्रेल्स, हायकिंग आणि ट्रेकिंग यांसारखे साहसी कार्यक्रम समाविष्ट करण्याचा मानस आहे, असे मंत्री रोहन खंवटे यांनी पुढे सांगितले. योग आणि तत्सम उपक्रमांना प्रोत्साहन देण्यावर देखील लक्ष केंद्रित केले आहे.
कनेक्टिव्हिटी हे एक महत्त्वपूर्ण आव्हान आहे, परंतु सरकारने प्रगती केली आहे. उदाहरणार्थ, ऋषिकेश आणि हरिद्वार सारख्या ठिकाणांना जोडण्यासाठी, ज्यासाठी किमान सात तास लागायचे, ते आता फक्त अडीच तासात साध्य होऊ शकते. आंतरराष्ट्रीय पर्यटकांचे प्रमुख स्त्रोत रशिया आणि यूके आहेत. तथापि, पोर्तुगाल, जपान, रशिया, दक्षिण कोरिया आणि युएई सारख्या देशांचा समावेश करण्यासाठी लक्ष वाढवले आहे.
"समुद्रकिनाऱ्यांच्या पलीकडे गोवा" या विधानाचा अर्थ समुद्रकिनाऱ्यांकडे दुर्लक्ष करणे असा होत नाही, कारण ते स्वतंत्रपणे विकसित होत आहेत.
ग्रामीण पर्यटनावर भर देणारे होमस्टे धोरण विकासासाठी प्रोत्साहन देईल. त्यासाठी पाठपुरावा सुरू आहे, ही सर्व माहिती मला समृध्द करून गेली. त्यांच्या प्रवाही वाणीची गती विलक्षण तेज आहे. देशी, विदेशी कार्यक्रमात त्यांनी गोव्याच्या पर्यटन नकाशाचं यथायोग्य सादरीकरण केलं आहे. त्याच प्रमाणे आयटी मुलुखातील संधींविषयी विस्तार करण्याचा वाव व नकाशा त्यांना ठाऊक आहे. त्यावरही प्रश्नोत्तरे झाली.
गोव्यात संस्कृती, परंपरा, वारसा आणि पर्यटन यांना चालना देण्याची गरज होती, ती भरून काढली गेली. आपल्या मुळांशी जाऊन ती ओली ठेवत एका वेगळ्या शांतीचा अनुभव करण्याची द्वारे त्यामुळे खुली होतील असे ते म्हणाले.
सण-उत्सव पर्यटनावर प्रामुख्याने भर दिला आहे. दिवाडीची बोंदेरां, माशेलांतील चिखलकालो, सांगोड या उत्सवांना पर्यटनाचा आयाम दिल्याने पर्यटनाला एक झळाळी व उभारी मिळाली आहे. होमस्टे आणि कारवान्सला प्रोत्साहन देणार्या धोरणांसह अंतर्देशीय पर्यटन, विशेषत: ग्रामीण पर्यटनाचाही शोध सुरू आहे अशी माहिती खंवटे यांनी दिली. शाश्वत, सुरक्षित आणि जबाबदार पर्यटनावर त्यांचं लक्ष आहे.
आकाशवाणी वरील रोहन खंवटे यांची मुलाखत विस्मरणीय ठरली.
मुकेश थळी
(लेखक साहित्य अकादेमी पुरस्कार प्राप्त साहित्यिक, अनुवादक, कोशकार असून आकाशवाणीचे निवृत्त वृत्तनिवेदक आहेत.)