निसर्ग म्हणजेच देवता. प्रत्येक भाविकाने डोंगर माथ्यावर जाताना नेलेली अविघटनशील वस्तू उतरणीच्या वेळी पायथ्याशी घेऊन जाण्याची जबाबदारी स्विकारल्यास कचऱ्याचा ढिगारा निर्माण होणारच नाही. पण त्यासाठी प्रत्येकाला जबाबदारीची जाणीव होणे अनिवार्य आहे.
‘आमचा एक फोटो काढता का प्लीज?’ असं विचारत माझा होकार ऐकण्यापूर्वीच एका युवतीने माझ्या हातात आपला मोबाईल आणून टेकवला. "मागचा कचरा तेवढा येऊ देऊ नका प्लीज", ती पॉझ देत म्हणाली. अरेच्चा! महादेवाच्या पिंडीवर दूध वाहून आत्ता तूच तर दुधाची पिशवी त्या कचऱ्याच्या ढिगाऱ्यात फेकून दिली होती, मी मनात म्हटलं. तिच्या सुचनेनुसार मोबाईल ऍडजस्ट करुन फोटो काढला व मोबाईल परत केला. एक गोष्ट मात्र मनातून काही केल्या जाईना. किती विचित्र आणि स्वार्थी असतात ना माणसं? मिळेल तिथे कचरा टाकायचा, पर्यटनस्थळे घाणेरडी करायची, निसर्गाचं सौंदर्य नष्ट करायचं, पण स्व:ताशी निगडित गोष्ट असली म्हणजे मात्र लगेच 'नको गं बाई माझ्या फोटोंमध्ये तो कचरा' असं म्हणायचं.
व्यस्त जीवनामधून थोडा उसंत घ्यावा म्हणून मी आणी माझ्या मित्र-मैत्रिणींनी कुठंतरी फिरायला जायचं ठरवलं. आम्हा समविचारी मित्र-मैत्रिणींचा सगळ्यात आवडता उसंत म्हणजे निसर्ग भ्रमंती. गोवा-महाराष्ट्र सीमेवरील सह्याद्रीच्या कुशीत भगवान शंकराची पिंड असल्याचा रील मी अनेकदा पाहिला होता. ठरलं! कसईनाथला जायचं. निसर्ग भ्रमंतीही होईल व त्यानिमित्ताने पवित्र अशा श्रावण महिन्यात भगवंताच दर्शनही घेता येईल.
कसईनाथ पर्वत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दोडामार्ग तालुक्यात निसर्गरम्य अशा पश्चिम घाटाच्या रांगेत उंच टेकडीवर वसलेला आहे. गोवामार्गे जाणारे भाविक/पर्यटक इथे डिचोलीमार्गे जाण्यास पसंती देतात. इथं पोहोचण्यासाठी दोडामार्गच्या आंबेली गावातून जावं लागतं. आंबेली गाव डिचोलीपासून १८ किलोमीटरच्या अंतरावर आहे. दोडामार्ग बाजारपेठेतून सरळ मार्गाने जाता, पाच-एक किलोमीटरच्या अंतरावर उजवीकडे एक भलंमोठं प्रवेशद्वार लागतं. श्री देवी सातेरी सिद्धनाथ प्रसन्न, आंबेली अशा आशयाची पाटी असलेल्या त्या प्रवेशद्वारातून दीड-दोन किलोमीटरचा प्रवास केल्यानंतर देवी सातेरी मंदिराजवळ (कसईनाथ पर्वताच्या पायथ्याशी) पोहोचतो. इथून कसईनाथ पर्वताचा दीड तासांचा खडतर प्रवास सुरू होतो.
पर्वताच्या पायथ्याशी गाडी पार्क करुन सकाळच्या प्रहरीच आम्ही गड चढायला सुरुवात केली. गडावर पोहोचण्यासाठी अगोदर गावातील शेतं, लहान-सहान ओढे, गवताळ-चिखलाची वाट पार करवी लागली. तदनंतर लागते ती एका भलामोठ्या डोंगराची उंचच उंच चढती. चोहोबाजूंनी वृक्ष वेलींनी वेढलेले घनदाट जंगल. थंड शितळ हवा. जैवविविधतेने नटलेल्या परिसरातून मजल दरमजल करत एक-दीड तासाच्या खडतर प्रवासानंतर आम्ही डोंगर माथ्यावर येऊन पोहोचलो. पोहोचताक्षणी समोर भगवान शिव शंकरांची पिंड दृष्टीस पडली व सारा क्षीण कुठच्या कुठे निघून गेला. चोहोबाजूंनी देव-देवतांच्या पाषाणी मूर्ती, मधोमध शिव भोलेनाथाची पिंड व रांगेत भगवंताच्या पिंडीवर दुधाचा अभिषेक करणारे असंख्य भाविक! पिंडीच्या समोरच काही अंतरावर नंदिची भग्नावस्थेतील पाषाणी मूर्ती पहायला मिळते.
पर्वताच्या टेकडीवरुन खाली पाहता नेत्रदीपक असा नजारा पाहायला मिळतो. दिवस पावसाळ्याचे असल्याने सगळीकडे फक्त हिरवळ दिसत होती; सोडून, भाविक उभे असलेल्या ठिकाणी! कसईनाथ पर्वत हे एक धार्मिक ठिकाण. एखाद्या ठिकाणाचे पावित्र्य राखण्याची प्रथम कडी म्हणजे स्वच्छता. पण दुर्दैवाने या ठिकाणी अगरबत्तीचे पुडे, चिप्स व्रेपर, खाणांचे प्लास्टिक डबे, पाण्याच्या बाटल्या, दुधाच्या पिशव्या इत्यादी वस्तूंनी भरलेल्या कचऱ्याचा ढीग दृष्टीस पडतो. दुर्गंधीमुळे या वातावरणातील प्रसन्नता कुठेतरी नष्ट होत चालल्याची प्रचिती येते.
आपल्या पूर्वजांनी निसर्गाचे संरक्षण व वन्यजीवांचे संवर्धन करण्यासाठी निराकार दगडाला देव मानले, अलिखित नियमावली आखून देवराईच्या रुपाने वनांचे जतन केले, प्रजननाच्या काळात वन्यजीवांचे संरक्षण करण्यासाठी सण-वार साजरे करण्यास सुरुवात केली. पिंडिवर दुधाचा अभिषेक करण्यामागील हेतू कदाचित प्रजनन काळात दुधातील पौष्टिक घटकांचा फायदा निसर्गातील लहान सहान किटकांना, किड्या-मुग्यांना व्हावा हा असावा.
निसर्ग म्हणजेच देवता. प्रत्येक भाविकाने डोंगर माथ्यावर जाताना नेलेली अविघटनशील वस्तू उतरणीच्या वेळी पायथ्याशी घेऊन जाण्याची जबाबदारी स्विकारल्यास कचऱ्याचा ढिगारा निर्माण होणारच नाही. पण त्यासाठी प्रत्येकाला जबाबदारीची जाणीव होणे अनिवार्य आहे. पर्यटन/धार्मिक स्थळांची पवित्रता राखणे आपल्या हातात आहे. प्रत्येक नागरिकाने स्वतःची जबाबदारी स्वतः उचलल्यास फोटो काढताना कचरा लपविण्यासाठी मोबाईल ऍडजस्ट करावा लागणार नाही.
स्त्रिग्धरा नाईक
(लेखिका विद्युत अभियांत्रिकीच्या
प्राध्यापिका आहेत.)