पोलीस तपास सुरू
गुरुग्राम : बिग बॉस ओटीटी-२ विजेता आणि लोकप्रिय यूट्यूबर एल्विश यादवच्या गुरुग्राममधील घरावर रविवारी पहाटे अज्ञात तिघा हल्लेखोरांनी अंधाधुंध गोळीबार केला. मोटारसायकलवर आलेल्या या तिघांनी सेक्टर ५७ मधील यादव याच्या घरावर तब्बल २५ ते ३० गोळ्या झाडल्या. गोळ्या घराच्या खालच्या आणि पहिल्या मजल्यावर लागल्या. सुदैवाने एल्विश हल्ल्याच्या वेळी घरी नव्हता, तसेच कोणतीही जीवितहानी झाली नाही.
पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत फॉरेन्सिक तपासणी सुरू केली असून, परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले जात आहेत. एल्विश यादवचे वडील म्हणाले की, तीन जण मास्क घालून आले होते. त्यापैकी दोघांनी खाली उतरून गोळीबार केला, तर एकजण बाइकवर बसला होता. गोळीबारानंतर ते पळून गेले.
२७ वर्षीय एल्विश यादवने यूट्यूबद्वारे प्रचंड लोकप्रियता मिळवली असून, २०२३ मध्ये बिग बॉस ओटीटी-२ विजेता ठरल्यानंतर त्याचा चाहता वर्ग वाढला. तो अनेक म्युझिक व्हिडिओ आणि शोमध्ये झळकला असला तरी, गेल्या वर्षी त्याचे नाव रेव्ह पार्टीत कोब्राचे विष वापरल्याच्या प्रकरणात आले होते आणि त्याला नोएडा पोलिसांनी अटकही केली होती. गोळीबाराची बातमी समजताच सोशल मीडियावर चाहत्यांनी चिंता व्यक्त केली आहे. पोलिसांनी या घटनेचा सखोल तपास सुरू केला असून, लवकरच प्रकरण उघड होईल असा विश्वास व्यक्त केला आहे.