जोयडा : यल्लापूर तालुक्यातील हिट्टिन बैलजवळ शुक्रवारी रात्री झालेल्या भीषण अपघातात तिघांचा जागीच मृत्यू झाला, तर सात जण गंभीर जखमी झाले आहेत. हा अपघात बल्लारी–कारवार राष्ट्रीय महामार्गावर घडला.
अंबेवाडीहून मंगळूरकडे निघालेली केएसआरटीसीची प्रवासी बस हूबळीकडून यल्लापूरच्या दिशेने येत होती. दरम्यान, महामार्गावर केरळ नोंदणीकृत एक लॉरी पार्किंग लाईट न लावता थांबली होती. मुसळधार पावसामुळे समोरील रस्त्याचा अंदाज न आल्याने बसने थेट लॉरीला जोरदार धडक दिली.
या धडकेत एका दोन महिला आणि एका पुरुषाचा जागीच मृत्यू झाला. मृतांपैकी दोन महिला बागलकोट जिल्ह्यातील असल्याचे निष्पन्न झाले असून एका पुरुषाची ओळख अद्याप पटलेली नाही. प्राथमिक माहितीनुसार, प्रवासी धर्मस्थळ यात्रेसाठी जात होते. या अपघातात जखमी झालेल्या सात प्रवाशांपैकी पाच जणांना हूबळी येथील कीम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले असून उर्वरित दोनजणांवर यल्लापूर सरकारी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
मृतदेह यल्लापूर येथील सरकारी रुग्णालयाच्या शवागृहात ठेवण्यात आले असून, नातेवाईकांची प्रतीक्षा आहे. या प्रकरणी यल्लापूर पोलीस स्थानकात गुन्हा नोंद करण्यात आला असून, पुढील तपास सुरू आहे.