मतदार यादीतील चुकांवर निवडणूक आयोगाचे स्पष्टीकरण
नवी दिल्ली : लोकशाही ही फक्त मतदानाचा अधिकार मिळवून देणारी प्रक्रिया नसून, ती प्रत्येक मतदाराचा आवाज सुरक्षित ठेवणारी व्यवस्था आहे. या व्यवस्थेची पायाभरणी म्हणजेच स्वच्छ आणि अचूक मतदार यादी. त्यामुळे निवडणूक आयोगाने स्पष्ट केले आहे की, मतदार यादीतील चुका टाळण्यासाठी राजकीय पक्ष, त्यांच्या बूथ लेव्हल एजंट्स (बीएलए) आणि प्रत्येक मतदाराने आपली जबाबदारी वेळेवर पार पाडणे अत्यंत आवश्यक आहे.
मतदार यादीतील चुकांच्या मुद्द्यावर विरोधकांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांना उत्तर देताना निवडणूक आयोगाने म्हटले आहे की, जर हे मुद्दे योग्य वेळी उपस्थित केले असते, तर चुका सुधारता आल्या असत्या. मतदार यादी तयार करण्याची प्रक्रिया पूर्णपणे पारदर्शक असून, त्यात सर्व राजकीय पक्षांचा सहभाग असतो, असे आयोगाने स्पष्ट केले. ड्राफ्ट मतदार यादीवर दावे आणि हरकती मागवल्या असतानाच हे मुद्दे उपस्थित करायला हवे होते, असेही आयोगाने म्हटले आहे.
मतदार यादी तयार करण्याची प्रक्रिया
निवडणूक आयोगाच्या म्हणण्यानुसार, भारतात निवडणुकांसाठी मतदार यादी तयार करण्याची प्रक्रिया अनेक स्तरांमध्ये विभागलेली आहे. ही जबाबदारी निवडणूक नोंदणी अधिकारी (ईआरओ), जे उपजिल्हाधिकारी (एसडीएम) दर्जाचे अधिकारी असतात, त्यांना दिली जाते. त्यांना बूथ लेव्हल ऑफिसर्स (बीएलओ) मदत करतात. हे अधिकारी मतदार यादीच्या अचूकतेसाठी जबाबदार असतात.
एक महिन्याचा कालावधी!
जेव्हा मतदार यादीचा ड्राफ्ट तयार होतो, तेव्हा त्याच्या डिजिटल आणि फिजिकल प्रती सर्व राजकीय पक्षांना दिल्या जातात. तसेच, ही यादी निवडणूक आयोगाच्या वेबसाइटवरही अपलोड केली जाते, जेणेकरून कोणीही ती पाहू शकेल. ड्राफ्ट यादी प्रसिद्ध झाल्यावर, मतदार आणि राजकीय पक्षांना तक्रारी किंवा हरकती नोंदवण्यासाठी एक महिन्याचा कालावधी दिला जातो, असे आयोगाने सांगितले.
कोणाकडे हरकती नोंदवाव्यात?
अंतिम यादी प्रसिद्ध झाल्यावरही तिच्या प्रती राजकीय पक्षांना दिल्या जातात आणि वेबसाइटवर अपलोड केल्या जातात. जर कोणाला काही तक्रार असेल, तर त्यासाठी दोन स्तरांवर अपील करण्याची संधी असते. पहिली जिल्हाधिकारी (डीएम) यांच्याकडे आणि दुसरी राज्य किंवा केंद्रशासित प्रदेशातील मुख्य निवडणूक अधिकारी (सीईओ) यांच्याकडे.
त्यावेळी मुद्दे उपस्थित करायला हवे होते!
काही राजकीय पक्ष आणि त्यांच्या बूथ लेव्हल एजंट्सनी (बीएलए) योग्य वेळी मतदार यादीची तपासणी केली नाही आणि चुकांकडे लक्ष दिले नाही. आयोगाने स्पष्ट केले की, जर त्यावेळी हे मुद्दे उपस्थित केले असते, तर संबंधित अधिकाऱ्यांनी त्या चुका सुधारल्या असत्या, असे आयोगाने म्हटले. आयोगाने सर्व राजकीय पक्ष आणि मतदारांना आवाहन केले की, त्यांनी मतदार यादीची तपासणी करावी आणि काही चूक आढळल्यास कळवावे. यामुळे मतदार यादी अधिक स्वच्छ होईल, ज्यामुळे लोकशाही बळकट होण्यास मदत होईल.