केरळ : तांत्रिक बिघाडामुळे कोची–दिल्ली एअर इंडिया विमान रद्द

विमान धावपट्टीवरून घसरले; दोन खासदार आणि अनेक प्रवाशांचा जीव टांगणीला

Story: वेब डेस्क । गोवन वार्ता |
18th August, 10:13 am
केरळ : तांत्रिक बिघाडामुळे कोची–दिल्ली एअर इंडिया विमान रद्द

कोची : एअर इंडियाच्या कोचीदिल्ली या एआय 504 क्रमांकाच्या विमानाला रविवारी उशिरा रात्री टेकऑफच्या अगोदरच तांत्रिक बिघाड झाल्याने उड्डाण रद्द करावे लागले. या विमानात काँग्रेसचे लोकसभा खासदार हिबी ईडन आणि राज्यसभा खासदार जे.बी. मथर प्रवास करीत होते.


मिळालेल्या माहितीनुसार, विमान धावपट्टीवरून उड्डाण घेण्याच्या तयारीत असताना पायलटला तांत्रिक समस्या जाणवली. तात्काळ एअर ट्रॅफिक कंट्रोलला कळवून टेकऑफ थांबवण्यात आला. त्यानंतर विमानाला देखभाल तपासणीसाठी परत विमानतळावर आणण्यात आले. प्रोटोकॉलचे पालन करून उड्डाण रद्द करण्यात आले असून प्रवाशांसाठी पर्यायी विमानाची व्यवस्था करण्यात आली आहे, असे एअर इंडियाने या संदर्भात निवेदन जारी करून सांगितले.

या घटनेवर प्रतिक्रिया देताना काँग्रेस खासदार हिबी ईडन यांनी सोशल मीडियावर लिहिले की, विमान धावपट्टीवर घसरल्यासारखे वाटले. ही परिस्थिती धोकादायक होती. त्यानंतर रात्री २.३० वाजता प्रवाशांना दुसऱ्या विमानाने दिल्लीला पाठवण्यात आले. हे विमान प्रवासासाठी सुरक्षित नाही, म्हणून त्याला थांबवण्यात आले, अशी माहिती पायलटणे दिल्याचे राज्यसभा खासदार जे.बीमथर यांनी दिली. 




गेल्या काही दिवसांत एअर इंडियाच्या विमानांमध्ये अशा घटना वारंवार घडत आहेत. त्याआधी शनिवारी मिलानदिल्ली ही फ्लाइट पुशबॅक दरम्यान तांत्रिक बिघाड झाल्यामुळे रद्द करण्यात आली होती. क्रू मेंबर्सची ड्युटीची वेळ संपल्याने उड्डाण धोकादायक ठरले असते. या घटनेबद्दल एअर इंडियाने प्रवाशांची माफी मागितली होती. वारंवार उद्भवणाऱ्या तांत्रिक बिघाडामुळे एअर इंडियाच्या विमान सुरक्षेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. प्रवासी सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी तातडीने प्रभावी उपाययोजना करण्याची मागणी होत आहे.

हेही वाचा