गुरुवारी या ‘महूर्तावर’ नव्या मंत्र्यांचा शपथविधी

नंतर जुन्या मंत्र्यांना खाते बदलाचे धक्के

Story: प्रतिनिधी | गोवन वार्ता |
2 hours ago
गुरुवारी या ‘महूर्तावर’ नव्या मंत्र्यांचा शपथविधी

पणजी : गोव्यात उद्या गुरुवारी दुपारी चांगल्या शुभ महूर्तावर नव्या मंत्र्यांचा शपथविधी होणार आहे आणि त्यानंतर खाते वाटपातून मुख्यमंत्री काही मंत्र्यांना धक्के देण्याची शक्यता आहे. आज पंतप्रधानांसोबतच्या बैठकीत मुख्यमंत्री या संदर्भातील प्रस्तावाला अंतिम स्वरूप देतील.




गुरुवारी राजभवनच्या दरबार हॉलमध्ये दोन मंत्र्यांचा शपथविधी होणार आहे. रमेश तवडकर आणि दिगंबर कामत हे मंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. त्यापूर्वी तवडकर राजीनामा देतील. तर बुधवारी पर्यावरण मंत्री आलेक्स सिक्वेरा राजीनामा देतील. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत दिल्लीतून बुधवारी रात्री परतल्यावर गुरुवारी नव्या मंत्र्यांचा शपथविधी होणार आहे. पर्यावरण मंत्री आलेक्स सिक्वेरा यांनी आपण वैयक्तिक कारणास्तव आज संध्याकाळपर्यंत राजीनामा देणार असल्याचे गोवन वार्ताशी बोलताना सांगितले.




गोविंद गावडे यांना १८ जून रोजी मंत्रिमंडळातून वगळल्यानंतर एक जागा रिक्त होती. आता दोन जागा रिक्त होतील त्यामुंळे तवडकर आणि कामत यांना मंत्रिपदी संधी मिळणार आहे. दरम्यान, विद्यमान सभापती रमेश तवडकर हे बुधवारी संध्याकाळी राजीनामा देऊ शकतात. त्यांना याबाबत विचारले असतापक्ष सांगतो त्या प्रमाणे माझे कार्य सुरू आहे, मी गुरुवारी सकाळी सभापतीपदाचा राजीनामा देईनअसे त्यांनी सांगितले. तवडकर यांच्या राजीनाम्यानंतर सावर्डेचे आमदार गणेश गांवकर यांची नवे सभापती म्हणून निवड करण्यात येणार आहे अशी माहिती भाजपच्या वरिष्ठ सूत्रांनी दिली.




* शनिवारी अमावस्या आहे. शुक्रवारी श्रावण मास संपतो. गुरुवारी सकाळी ११.३६ ते दुपारी १२.३६ वाजे पर्यंत चांगला मुहूर्त आहे. त्या दरम्यान शपथविधी होणार आहे. शुक्रवारपर्यंत मुख्यमंत्री खातेवाटप करतील. हे खातेवाटप फक्त दोन मंत्र्यांचेच नसून काही विद्यमान मंत्र्यांच्या खात्यांमध्ये मोठे बदल होणार आहेत.


* मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची दिल्लीत भेट घेतील. मंत्रीमंडळ फेरबदल आणि खाते वाटपाबाबत त्यांच्याशी अंतिम चर्चा करून त्यांच्या मंजुरीनंतरच शुक्रवारपर्यंत खातेवाटप होणार आहे.