सर्व व्यवहार पारदर्शक : सरपंच मानसी कवठणकर यांचा दावा
पत्रकार परिषदेत मूळगावच्या सरपंच मानसी कवठणकर व इतर पंच.
...
प्रतिनिधी। गोवन वार्ता
डिचोली : मुळगाव ग्रामपंचायत क्षेत्रात कोमुनिदाद जमिनीत गोवा मुक्ती फंडातून बांधण्यात येणाऱ्या मैदानाच्या कामात मोठा घोटाळा झाल्याचा आरोप मागील महिन्यात झालेल्या खास ग्रामसभेत ग्रामस्थानी केला होता. या पार्श्वभूमीवर मंगळवारी पंचायत मंडळातील चार सदस्यांनी पत्रकार परिषद घेऊन सदर आरोप खोडून काढताना या कामात एका पैशाचाही घोटाळा झाला नसल्याचे, तसेच संपूर्ण व्यवहार पारदर्शक असल्याचे सांगितले. यावेळी सरपंच मानसी कवठणकर, उपसरपंच गजानन मांद्रेकर, विशालसन गाड व पंच सुहासिनी गोवेकर उपस्थित होते.
गोवा मुक्ती निधीतून जी कामे ठरविण्यात आली होती, त्यापैकी बहुतांश कामे पूर्ण झाली आहेत. राहिलेली महिला व पुरुष प्रसाधनगृह आणि लोखंडी जाळी ही कामे हल्लीच तीन कोटी रुपयांचा निधी मंजूर झालेल्या दीनदयाळ निधीतून करण्यात येणार आहेत, असे सरपंच मानसी कवठणकर यांनी स्पष्ट केले. त्यासाठीचे सर्व सोपस्कार पूर्ण केले आहेत. उच्च अधिकाऱ्यांकडून मान्यताही मिळविली आहे. उच्च अधिकाऱ्यांच्या सूचनेनुसारच स्वामी समर्थ कन्स्ट्रक्शन या कंत्राटदाराला कम्प्लिशन सर्टिफिकेट दिले असल्याचे त्यांनी सांगितले.
दीनदयाळ निधीतून नवीन कामासाठी नेमलेल्या तांत्रिक सल्लागाराच्या सल्ल्यानुसारच वरील दोन्ही कामे वगळली आहेत. मैदानाच्या नवीन आराखड्यावर एकूण दहा टॉयलेट ब्लॉक आहेत. आम्ही ग्रामस्थांना वचन दिल्याप्रमाणे येत्या सहा महिन्यांत हे टॉयलेट बांधून दिले, तर मैदानाला जागाही अपुरी पडेल शिवाय बांधकामही मोडून टाकावे लागले असते. त्यामुळे ठराव घेऊन सातही पंच सदस्यांनी सही करून सदर अहवाल गट विकास कार्यालयाला सुपूर्द केला आहे.
मैदान लवकर पूर्ण करण्यासाठी प्रयत्नरत : सरपंच
सदर मैदान लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी आम्हीही प्रयत्न करीत आहोत. त्यासाठी शक्य तितक्या लवकर पुढील सोपास्कर करून आम्ही मैदान बांधून देऊ. त्यासाठी ग्रामस्थानी आम्हाला सहकार्य करावे, असे सरपंच मानसी कवठणकर यांनी सांगितले. या विषयावरून वेळोवेळी ठराव घेऊन, तसेच सर्व सदस्याची मान्यता घेऊनच व्यवहार केला असल्याचे विशालसेन गाड यांनी सांगितले.