कुंकळ्ळीतील पीडितेला न्याय मिळावा : आवढा व्हिएगस यांनी पत्रकार परिषद घेत केली मागणी
मडगाव : कुंकळ्ळी येथील वर्षीय युवतीशी समाजमाध्यमांवरुन मैत्री करत तिच्याकडून उकळून नंतर लग्नाचे आमिष दाखवत तिच्यावर लैंगिक अत्याचार करणाऱ्या मेल्सन कुतिन्हो या ४५ वर्षीय संशयिताला वैद्यकीय उपचारांती अटक केली आहे. बायलांचो एकवोटच्या अध्यक्षा आवढा व्हिएगस यांनी मडगाव येथे पत्रकार परिषद घेत कुंकळ्ळीतील पीडितेला न्याय मिळावा अशी मागणी केली होती.
प्रकरण काय ?
मेल्सन कुतिन्हो या ४५ वर्षीय संशयिताने कुंकळ्ळी परिसरातील एका २७ वर्षीय युवतीशी स्नॅपचॅट या समाजमाध्यमावरुन संपर्क साधत मैत्री केली. त्यानंतर आपल्या कुटुंबीयात अडचण असल्याचे सांगत प्रारंभी २० हजार, त्यानंतर ३० हजार रक्कम घेतली. त्यानंतर त्याने आणखी पैशांची मागणी केली असता, युवतीने आपल्याकडील सुमारे ९० लाखांचे सोन्याचे दागिने त्याला दिले. यानंतरही तिच्याशी गोड बोलून तिला लग्न करतो असे सांगत तिच्यावर लैंगिक अत्याचार केले. याप्रकरणी फसवणूक झाल्याचे लक्षात येताच पीडितेने कुंकळ्ळी पोलिसांत तक्रार केली, नंतर पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन वैद्यकीय तपासणीसाठी नेले असता तब्बेत चांगली नसल्याचे सांगत जिल्हा इस्पितळात दाखल करण्यात आले. नंतर पोलिसांनी त्याला रीतसर अटक केली.
पोलिसांवरील हल्ल्यांचा निषेध
कुंकळ्ळी येथील पोलिसांवर कामगारांकडून हल्ला करत जखमी करण्यात आले. त्यानंतर फातोर्डा येथे अटक झालेल्या संशयिताच्या कुटुंबीयांनी महिला पोलीस उपनिरीक्षकाला धक्काबुक्की केली. त्यानंतर पुन्हा वास्को येथील पोलिसांना मारहाणीची घटना घडली. या घटनांचा निषेध नोंदवत आवढा व्हिएगस यांनी अशी प्रकरणे होऊ नये साठी समाजातील अशा घटकांवर कडक कारवाईची मागणी केली. भाड्याने राहणार्या सर्वांच्या पोलीस पडताळणीचीही त्यांनी या पत्रकार परिषदेत मागणी केली.