मडगाव : रवींद्र भवनाचे काम ऑक्टोबरपर्यंत होणार पूर्ण : राजेंद्र तालक

कामावर देखरेखीसाठी टास्क फोर्सची निर्मिती

Story: वेब डेस्क । गोवन वार्ता |
47 mins ago
मडगाव : रवींद्र भवनाचे काम ऑक्टोबरपर्यंत होणार पूर्ण : राजेंद्र तालक

मडगाव : मडगाव रवींद्र भवनच्या देखभाल दुरुस्तीचे काम ऑक्टोबर अखेरपर्यंत पुढील ६० दिवसांत पूर्ण करण्याचे लक्ष्य आहे. कामांवर देखरेखीसाठी कलाकार विजय केंकरे यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापण्यात आली आहे, अशी माहिती रवींद्र भवनचे अध्यक्ष राजेंद्र तालक यांनी दिली.



मडगाव येथे पत्रकार परिषद घेत अध्यक्ष तालक यांनी ही माहिती दिली. यावेळी उपाध्यक्ष मनोहर बोरकर, सदस्य सचिव सीमा दळवी उपस्थित होत्या. काहीजण केवळ रवींद्र भवनच्या कामांबाबत चुकीच्या गोष्टी बोलत आहेत. त्यांनी याठिकाणी येउन परिस्थिती जाणून घेण्याची गरज आहे. आमदार दिगंबर कामत व मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या पुढाकारातून आता रवींद्र भवनच्या देखभाल दुरुस्तीच्या कामांना सुरुवात झाली असून, ऑक्टोबरअखेरपर्यंत काम पूर्ण होईल असे तालक यांनी सांगितले. रवींद्र भवनातील कामे केली जात असताना, मुख्य सभागृहाचे काम आधी हाती घेतले जाईल. त्याशिवाय ब्लॅक बॉक्सएनेक्स इमारतीचे कामही बरोबरीने केले जाणार आहे. सर्व कलाकार, निर्माते, दिग्दर्शक यांना विश्वासात घेत हा निर्णय घेतलेला आहे. या कामांवर देखरेखीसाठी विजय केंकरे यांच्या अध्यक्षतेखाली, प्रशांत वराडकर, राजन भिसे यासह बांधकाम खात्याचे अभियंता असलेली समिती स्थापन करण्यात आलेली आहे. दर पंधरा दिवसांनी ही समिती कामांचा आढावा घेत कामे थांबणार नाहीत याची काळजी घेईल. तसेच रवींद्र भवनकडूनही आवश्यक ती मदत पुरवली जाईल, असेही स्पष्ट केले.

के. वैकुंठ जन्मशताब्दी होणार साजरी : तालक

रवींद्र भवनकडून कोंब मडगाव येथील सिनेमाटोग्राफर वैकुंठ कुंकळ्येकर ( २१ ऑगस्ट १९२५) यांची जन्मशताब्दी साजरी केली जाईल. जानेवारी २०२६ मध्ये तीन दिवसीय फिल्म फेस्टिवल साजरा केला जाणार असून गुलझार, रमेश सिप्पी, हेमामालिनी या कलाकारांना त्यावेळी आमंत्रण देण्याचा विचार आहे. याशिवाय संगीतकार अँथनी गोन्साल्वीस, फिल्म एडिटर भानुदास दिवकर, पेंटर लक्ष्मण पैमारिओ मिरांडा यांची जन्मशताब्दीही साजरी केली जाणार असल्याची माहिती तालक यांनी दिली.