तीन वेळा सापडल्यास गाडी परवाना रद्द : सरकारची कारवाई
साखळी : राज्य सरकारने कचऱ्यासंदर्भातील कायद्यात कठोरता आणली असून, यापुढे उघड्यावर कचरा फेकणाऱ्या वाहनांना १० हजार रुपये दंड आकारला जाईल. जर तेच वाहन तिसऱ्यांदा आढळले, तर त्याचा परवाना रद्द करण्यात येईल. नागरिकांनी कचरा फेकणाऱ्या वाहनांचा क्रमांक पोलिसांना द्यावा, असे आवाहन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केले.
न्हावेली ग्रामपंचायतीत उभारलेल्या एमआरएफ शेड आणि नूतनीकरण केलेल्या सभागृहाच्या उद्घाटन सोहळ्यात ते बोलत होते. यावेळी सरपंच रोहिदास कानसेकर, उपसरपंच कल्पना गावस, बिडिओ ओमकार मांजरेकर, देवस्थानचे अध्यक्ष विश्वंभर गावस, न्हावेली कोमुनिदादचे अध्यक्ष सिद्धांत रमेश गावस, मुखत्यार अवधूत गावस, खजिनदार सखाराम गावस आणि पंचसदस्य उपस्थित होते.
सुरुवातीला मुख्यमंत्र्यांच्या हस्ते एमआरएफ शेडचे कोनशीला अनावरण करून उद्घाटन करण्यात आले. यावेळी सरपंच रोहिदास कानसेकर यांनी आपल्या स्वागतपर भाषणात न्हावेली पंचायत क्षेत्रात आतापर्यंत मुख्यमंत्र्यांच्या सहकार्याने साधलेल्या विकासाची माहिती दिली. पंचसदस्य कालिदास गावस यांनी आभार मानले.
स्वच्छ आणि सुंदर गावासाठी सहकार्य करा
मुख्यमंत्र्यांनी सांगितले की, न्हावेली गावात एमआरएफ शेड उभारण्यासाठी कोमुनिदादने जागा उपलब्ध करून दिली. आता गावकऱ्यांनी आपला गाव स्वच्छ ठेवण्याची जबाबदारी ओळखून कचरा उघड्यावर न टाकता पंचायतीकडे सुपूर्द करावा व सहकार्य करावे. यामुळे ७८ लाख रुपये खर्चून उभारलेल्या या शेडचा योग्य उपयोग होईल, असे ते म्हणाले.