मडगाव भागात मुसळधार; वीज तारांचे नुकसान
कोसळेल्या संरक्षक भिंतीची पाहणी करताना अग्निशामक दलाचे जवान.
प्रतिनिधी। गोवन वार्ता
मडगाव : मडगाव व परिसरात वादळी वाऱ्यासह पावसामुळे पडझडीच्या घटना घडल्या. घोगळ येथील एका इमारतीची संरक्षक भिंत कोसळली. याशिवाय दिकरपाल येथे संरक्षक भिंतीवर, तर माकझाना येथे वीज तारांवर
झाडे पडली.
राज्यात पावसाचा जोर कायम आहे. वादळी वाऱ्यासह येणाऱ्या पावसामुळे झाडे पडणे, संरक्षक भिंत कोसळण्याच्या घटना घडत आहेत. मडगावातील घोगळ परिसरातील कुडतरकर लँडमार्क या इमारतीची संरक्षक भिंत सकाळी पावसामुळे कोसळली. आमदार विजय सरदेसाई यांनी घटनास्थळाची पाहणी केली. यावेळी मामलेदार व जलस्रोत खात्याचे अधिकारी उपस्थित होते. या इमारतीत सुमारे १६० फ्लॅट असून अडीचशेहून अधिक रहिवासी आहेत. त्यामुळे आपत्कालीन परिस्थिती म्हणून काम हाती घेण्याच्या सूचना केल्या आहेत. या संरक्षक भिंतीचे उर्वरित बांधकाम न काढल्यास पडण्याची शक्यता अग्निशामक दलाने व्यक्त केली. पाळी दिकरपाल येथे माडासह आंब्याचे झाड संरक्षक भिंतीवर पडले. राशोल येथे पंचायतीनजीक रस्त्यावर झाड कोसळले. माकाझान नवा बाजार येथे आंब्याचे झाड वीज तारांसह रस्त्यावर पडले. झाडे तोडून मडगाव अग्निशामक दलाने रस्ता वाहतुकीसाठी मोकळा केला.