पायाच्या बोटांचे ठसे वापरून मिळवले आधारकार्ड

जीएसटी घोटाळा : दोन्ही आस्थापनांची​ एकूण १९० कोटी रुपयांची उलाढाल

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
19th August, 07:02 am
पायाच्या बोटांचे ठसे वापरून मिळवले आधारकार्ड

पणजी : बनावट बिलांचा वापर करून तब्बल ४० कोटी रुपयांचा जीएसटी घोटाळा उघडकीस आणण्यात आला आहे. हा घोटाळा जीएसटी इंटेलिजेन्स महासंचालनालयाच्या (डीजीजीआय) गोवा विभागाने उघड केला असून या प्रकरणात राजस्थानमधील एका कामगाराच्या नावाने बनावट कागदपत्रे तयार करून गोव्यात दोन आस्थापने स्थापन करण्यात आल्याचे समोर आले आहे.
बार्देश तालुक्यात शिवोली आणि म्हापसा परिसरात ‘संदीप होम अप्लायन्सेस’ आणि ‘अभिषेक होम अप्लायन्सेस या दोन आस्थापनांद्वारे जीएसटी घोटाळा होत असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार, विभागाचे उपसंचालक ‌शिबी सिंह गहरवार यांच्या मार्गदर्शनाखाली वरीष्ठ तपास अधिकारी दिपमाला परब आणि विनय बाबू याच्या नेतृत्वाखाली पथकाने चौकशी सुरु केली. त्यानुसार पथकाने ८ जुलै रोजी वरील आस्थापनांचा पत्ता शोधला. त्यानंतर तेथील घर मालक आणि दुकान मालकांची चौकशी केली असता, दोन्ही आस्थापना जोधपूर - राजस्थान येथील मुकेश कुमार याच्या नावाने आधार कार्डचा वापर केल्याचे समोर आले. त्यानुसार, पथकाने ९ रोजी मुकेश कुमार याच्या शोध घेतला असता, तो एक कामगार असून त्याच्या पायाच्या बोटाचे ठसेचा वापर करून आधार कार्ड मिळवल्याचे उघड झाले.
तपास पथकाने या आस्थापनांच्या जीएसटी क्रमांकासंदर्भातील मोबाईल क्रमांक मिळवून खातरजमा केली असता, तोच क्रमांक तब्बल ६५ आस्थापनांमध्ये वापरला गेला असल्याचे आढळले. या क्रमांकाद्वारे बनावट बिल तयार करणे, आयटीसी दावे करणे, बँक खाती उघडणे तसेच बनावट आधारकार्ड तयार करणे असे अनेक व्यवहार झालेले दिसून आले. मोबाईल लोकेशन तपासल्यानंतर या क्रमांकाचा वापर चेन्नई, बंगळुरू आणि आंध्रप्रदेशातील व्यक्तींनी केल्याचे स्पष्ट झाले.
डीजीजीआयच्या पथकाने ३१ जुलै रोजी छापेमारी केली. या वेळी चेन्नईतून पुखराज किशना राम (मूळ राजस्थान) याला अटक करण्यात आली. बंगळुरूतील एका महिलेकडून चौकशी करण्यात आली, तर आंध्रप्रदेशातील एका बनावट आस्थापनावर छापा टाकण्यात आला. या कारवाईत १६७ कोटी रुपयांची बनावट इनव्हॉइसिंग कागदपत्रे, ९ मोबाईल फोन, मोठ्या प्रमाणावर सिम कार्ड, बनावट आधारकार्ड, बँक खाती व इतर साहित्य जप्त करण्यात आले.
संदीप होम अप्लायन्सेसद्वारे १०० कोटींचा बनावट व्यवहार
संदीप होम अप्लायन्सेसद्वारे तब्बल १०० कोटींचा बनावट व्यवहार दाखवला. यातून प्रत्यक्ष व्यवहार न करता १७ कोटी रुपयांचा बनावट आयटीसी दावा करण्यात आला. अभिषेक होम अप्लायन्सेसद्वारे ९० कोटींचा बनावट व्यवहार दाखवला. यातून प्रत्यक्ष व्यवहार न करता १६ कोटी रुपयांचा बनावट आयटीसी दावा करण्यात आला.