म्हापसा बाजारात भूमिगत वाहिनी तुटल्याने रस्त्यावर विजेचा करंट

खराब कामामुळे धोका वाढला, नागरिकांत भीतीचे वातावरण

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
19th August, 12:14 am
म्हापसा बाजारात भूमिगत वाहिनी तुटल्याने रस्त्यावर विजेचा करंट

म्हापसा बाजारपेठेतील तुटलेल्या भूमिगत वीज वाहिनीला येणारा करंट. (उमेश झर्मेकर).

म्हापसा : म्हापसा बाजारपेठेत भूमिगत वीज वाहिनी तुटल्याने शकुंतलेच्या पुतळ्याजवळील रस्त्याला विजेचा करंट येऊ लागला. एका व्यक्तीला विजेचा धक्का बसल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. संभाव्य दुर्घटना टाळण्यासाठी वीज विभागाने परिसरातील वीजपुरवठा तात्काळ खंडित केला आहे.
सोमवारी रात्री ८ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. एका व्यक्तीला विजेचा धक्का बसल्यानंतर व्यापाऱ्यांनी वीज कर्मचाऱ्यांना बोलावले. तपासणी केली असता, रस्त्याच्या मधोमध भूमिगत वीज वाहिनी तुटल्याचे आढळून आले आणि त्यामुळेच संपूर्ण रस्त्यावर करंट पसरला होता.
व्यापाऱ्यांनी याआधीही भूमिगत वाहिन्यांसाठी वापरलेल्या निकृष्ट दर्जाच्या उपकरणांबाबत आवाज उठवला होता. काही दिवसांपूर्वीच बाजारात विजेचा धक्का लागून एका बैलाचा मृत्यू झाला होता, तर एका विक्रेत्यालाही करंट लागण्याची घटना घडली होती. या घटनेमुळे पुन्हा एकदा बाजारात भीतीचे वातावरण पसरले आहे.
चतुर्थीपूर्वी उपकरणांची तपासणी करा
सध्या गणेश चतुर्थीचा सण आहे. चतुर्थी निमित्त बाजार व्यापारी व ग्राहकांनी गजबजलेला असेल. त्यामुळे चतुर्थीपूर्वी वीज खात्याने भूमिगत वीज वाहिनी तसेच उपकरणांची पडताळणी करावी व बाजारपेठ सुरक्षित असल्याची खात्री करून घ्यावी, अशा मागणी म्हापसा व्यापारी संघटनेचे सरचिटणीस सिद्धेश राऊत यांनी केली आहे.

म्हापसा बाजारपेठेतील रस्त्यावर करंट येण्याचा हा प्रकार पथदीप किंवा वीज वाहिन्यातील गळतीमुळे घडला असावा असा अंदाज आहे. त्यामुळे लागलीच वीज पुरवठा खंडित करण्यात आला असून याबाबतीत वीज कर्मचाऱ्यांमार्फत योग्य तपासणी केली जाईल.
- सुभाष पार्सेकर, कार्यकारी वीज अभियंता.