दस्तऐवज दाखवल्यानंतर वाद उद्भवल्याने रागाच्या आवेशात घडली घटना. संशयित पोलिसांच्या ताब्यात

नवी दिल्ली : दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांच्यावर बुधवारी सकाळी मुख्यमंत्री निवासस्थानी जनसुनावणी दरम्यान हल्ला करण्यात आला. मिळालेल्या माहितीनुसार, एका व्यक्तीने त्यांच्या हाताला धरून ओढले, यावेळी त्यांचा डोक्याला टेबलच्या कडेला मार लागून दुखापत झाली. काही माध्यमांनी थप्पड मारल्याचा दावा केला असला तरी भाजपने ही बाब चुकीची असल्याचे सांगितले.

संशयित व्यक्तीने मुख्यमंत्री गुप्ता यांचा हात धरला आणि ओढले, याचवेळी त्यांचे डोके जोरात टेबलला लागले. थप्पड मारल्याची बाब खोटी असल्याचे त्यांनी सांगितले. मात्र मुख्यमंत्री कार्यालयाने हल्ल्याची पुष्टी करत आरोपीला पोलिसांच्या ताब्यात घेतल्याची माहिती दिली. त्याची चौकशी सुरू आहे असेही दिल्ली भाजप अध्यक्ष वीरेंद्र सक्सेना यांनी स्पष्ट केले. जनसुनावणीला आलेल्या ३५ वर्षीय व्यक्तीने दस्तऐवज दाखवल्यानंतर वाद उद्भवल्याने रागाच्या आवेशात मुख्यमंत्री गुप्ता यांच्यावर हल्ल्याचा प्रयत्न केला असे भाजप प्रवक्ते प्रवीण शंकर कपूर यांनी सांगितले. तसेच ही व्यक्ती एखाद्या राजकीय पक्षाशी संबंधित असण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली.
दरम्यान, काँग्रेसने या घटनेवर तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली. जर दिल्लीच्या मुख्यमंत्रीच सुरक्षित नसतील तर सामान्य नागरिकांची सुरक्षा कशी असेल? असा सवाल दिल्ली काँग्रेस अध्यक्ष देवेंद्र यादव यांनी उपस्थित केला. ही घटना महिलांच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणारी असल्याचे त्यांनी म्हटले.आप नेत्या आणि दिल्ली विधानसभा विरोधी पक्षनेत्या आतिशी यांनी या घटनेचा निषेध केला. “लोकशाहीत विरोधाला स्थान आहे, पण हिंसेला कधीच जागा नाही. पोलिसांनी कठोर कारवाई करावी,” असे त्यांनी एक्सवर पोस्ट करून लिहिले.
