‘नेशनल डीपवॉटर एक्सप्लोरेशन मिशन’वर लक्ष केंद्रित. ऊर्जा क्षेत्रात झेप घेण्यास भारत सज्ज
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ७९व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त लाल किल्ल्यावरून देशाला संबोधित करताना ऊर्जा क्षेत्रातील स्वावलंबनाकडे महत्त्वाचे पाऊल टाकत ‘नेशनल डीपवॉटर एक्सप्लोरेशन मिशन’ सुरू करण्याची मोठी घोषणा केली. या मिशनद्वारे समुद्राच्या तळाशी असलेल्या तेल आणि नैसर्गिक वायूच्या साठ्यांचा शोध घेऊन त्यांचा विकास करण्यासाठी मध्ये काम केले जाणार आहे. मोदी म्हणाले, भारत आता समुद्र मंथन करणार असून, सागराच्या उदरात असलेल्या संपत्तीचा शोध घेऊन ऊर्जाक्षेत्रात मोठी झेप घेईल. ही आत्मनिर्भर भारतासाठीची महत्त्वाची पायरी आहे.
यावेळी पंतप्रधानांनी ‘क्रिटिकल मिनरल’च्या शोध आणि स्वावलंबनाचाही मुद्दा मांडला. आधुनिक तंत्रज्ञान, इलेक्ट्रॉनिक्स, अक्षय ऊर्जा प्रकल्प आणि इतर महत्त्वाच्या उद्योगांसाठी आवश्यक पण मर्यादित उपलब्धता असलेल्या या खनिजांचा पुरवठा निश्चित करण्यासाठी ‘नेशनल क्रिटिकल मिनरल मिशन’ राबवले जात आहे. देशभरातील १,२०० पेक्षा जास्त ठिकाणी या खनिजांचा शोध सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. मोदी म्हणाले की, आज जगभरात क्रिटिकल मिनरलच्या महत्त्वाबाबत जागरूकता वाढली आहे. काही मोजक्या देशांमध्येच यांचा साठा असल्यामुळे त्यासाठी तीव्र स्पर्धा आहे. भारतालाही यात स्वावलंबी बनावे लागेल.
आपल्या नावीन्यपूर्ण कल्पना मांडा, त्यांच्यावर काम करा, त्यांना कधीही मरू देऊ नका. तुमच्या डोक्यातून आलेली एक कल्पना उद्याच्या पिढीचे भविष्य बदलू शकते. मी तुमच्यासोबत आहे. पुढाकार घ्या, जोखीम घ्या आणि देशाला पुढे घेऊन जा. २०४७ आता जास्त दूर नाही, त्यामुळे एक क्षणही वाया घालवू नका. मेहनत करा. असे युवकांना उद्देशून त्यांनी आवाहन केले.