म्हापसा : वाढदिवशीच काळाचा घाला; जेवण आणण्यासाठी जाताना स्वयंअपघात झाल्याचा संशय!

झाडीत कुजलेल्या अवस्थेत आढळला मृतदेह; ७ ऑगस्टपासून होता बेपत्ता

Story: वेब डेस्क । गोवन वार्ता |
15th August, 04:08 pm
म्हापसा : वाढदिवशीच काळाचा घाला; जेवण आणण्यासाठी जाताना स्वयंअपघात झाल्याचा संशय!

म्हापसा : आशिष कुमार झा (२५, रा. वझरी, मूळ उत्तर प्रदेश) याचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत पिर्णा-नादोडा मार्गाच्या कडेला झाडीत आढळला असून, स्वयंअपघातात मृत्यू झाल्याची शक्यता आहे. तो ७ ऑगस्ट रोजी वझरी ते पिर्णा मार्गे नादोडाकडे जाताना बेपत्ता झाला होता. घटनास्थळी त्याची पल्सर मोटारसायकलही आढळली.

ही घटना शुक्रवारी सकाळी उघडकीस आली. पिर्णा-नादोडा मार्गावरून जाणाऱ्या वाहनचालकांना एका वळणावरून दुर्गंधी येत असल्याचे जाणवल्यानंतर याबाबत कोलवाळ पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून पाहणी केली असता दाट झुडपात आशिषचा मृतदेह आणि दुचाकी आढळली. पोलिसांनी अंगावरील कपड्यांतील कागदपत्रांवरून त्याची ओळख पटवली. मृतदेह शवविच्छेदनासाठी गोमेकॉत पाठवण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.

आशिष ७ ऑगस्ट रोजी आपल्या वाढदिवशी वझरी येथून पिर्णामार्गे म्हापसाच्या दिशेने जेवण आणण्यासाठी निघाला होता. त्याआधी त्याने मित्रांसोबत खोलीवर वाढदिवसाची पार्टी केली होती. मात्र तो परतला नाही. दुसऱ्या दिवशीही तो घरी न आल्याने मित्रांनी शोध घेण्याचा प्रयत्न केला, पण त्याचा फोन बंद असल्याने संपर्क झाला नाही. अखेर ९ ऑगस्ट रोजी मोपा पोलिसांत बेपत्ता असल्याची तक्रार दाखल करण्यात आली होती.

हेही वाचा