बचावकार्य युद्ध पातळीवर सुरूच; मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता
श्रीनगर : जम्मू-कश्मीरच्या किश्तवाड जिल्ह्यातील चशोती भागात शुक्रवारी १४ ऑगस्ट रोजी उद्भवलेल्या ढगफुटीमुळे हाहाकार माजला आहे. या पूर आणि भुस्खलनामुळे उद्भवलेल्या विनाशामुळे मोठ्यप्रमाणात जीवित हानी झाली आहे. आतापर्यंत नदी आणि दरडी मधून सुमारे ६५ मृतदेह बाहेर काढण्यात आले असून, १०० हून अधिक जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अनेकजण अजूनही बेपत्ता आहेत. मोठ्या संख्येने लोक नदीच्या पाण्यात वाहून गेले असावेत, अशी शक्यता अधिकाऱ्यांनी वर्तवली आहे.
माजी मुख्यमंत्री फारूक अब्दुल्ला यांनी अधिकाऱ्यांच्या हवाल्याने सांगितले की, ५०० हून अधिक लोक अजूनही दरडीखाली असू शकतात, तर काही अंदाजानुसार ही संख्या १,००० पर्यंत पोहोचू शकते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला यांच्याशी दूरध्वनीवरून संवाद साधून परिस्थितीची माहिती घेतली आणि सर्वतोपरी मदतीचे आश्वासन दिले. पंतप्रधानांनी मृतांच्या कुटुंबीयांप्रती संवेदना व्यक्त केल्या.
या दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर जम्मू-कश्मीरमधील स्वातंत्र्यदिनाचा उत्सवही फिका पडला. श्रीनगरच्या बख्शी स्टेडियमवर ध्वजारोहण करताना मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला यांनी किश्तवाडच्या घटनेत झालेल्या जीवितहानीबद्दल शोक व्यक्त केला. मंत्री जावेद डार यांनी दिलेल्या माहितीनुसार, बेपत्ता लोकांची नेमकी संख्या अद्याप स्पष्ट झालेली नाही. एनडीआरएफ, एसडीआरएफ, स्थानिक प्रशासन आणि लष्कराचे जवान सलग बचाव कार्य करत आहेत. घटनास्थळी मदत व शोधकार्य सुरू असून, पाण्यात वाहून गेलेल्यांचा शोध घेण्यात मोठ्या अडचणी येत आहेत.