स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
पणजी : कोमुनिदाद जमिनीत असलेल्या बेकायदेशीर घरांना अधिकृत करताना संबंधितांकडून दंड व जमिनीचे शुल्क वसूल केले जाणार आहे. कोणालाही मोफत जागा दिली जाणार नाही, असे स्पष्ट करत मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी कोमुनिदादींना या प्रक्रियेत सहकार्य करण्याचे आवाहन केले. भविष्यात सरकारी किंवा कोमुनिदाद जमिनीत बेकायदा बांधकामे होऊ नयेत यासाठी हा उपाय असल्याचे त्यांनी सांगितले.
स्वातंत्र्य दिनाच्या मुख्य कार्यक्रमात डॉ. सावंत म्हणाले की, गँगवॉर रोखण्यासाठी नोंद न केलेल्या सुरक्षा एजन्सी बंद केल्या जाणार आहेत. विविधतेने नटलेल्या भारताला विकसित करण्यासाठी प्रत्येक नागरिकाने आपापल्या परीने योगदान द्यावे. ब्रिटिशांच्या १५० वर्षांच्या जुलमी राजवटीतून देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी स्वातंत्र्यसैनिकांनी दिलेले बलिदान लक्षात ठेवून आपल्या इतिहासाची जाणीव ठेवणे आवश्यक आहे. आत्मनिर्भर भारत आणि स्वयंपूर्ण गोवा घडवण्यासाठी जनसहभाग महत्त्वाचा आहे, असे ते म्हणाले. गोव्याचा विकास सुरक्षित व परिपूर्ण करण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे. स्वदेशी वस्तूंचा वापर करण्याचे आवाहन करताना त्यांनी सांगितले की, स्वातंत्र्याचे फळ उपभोगताना गोव्याचा सर्वांगीण विकास करण्यासाठी सरकार कटिबद्ध आहे.
हॅपीनेस इंडेक्स वाढवण्यासाठी हक्काचे घर, आदिवासी कल्याण, हस्तकला प्रोत्साहन, बांधकाम कामगारांचे पगारवाढ, तरुणांना कौशल्य प्रशिक्षण, दिव्यांग, महिला व शेतकऱ्यांचे सक्षमीकरण यावर भर दिला आहे. तसेच भाविकांसाठी अयोध्येत रामनिवास आणि पंढरपुरात गोवा-पंढरपुर भवन उभारणीचे काम सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. या कार्यक्रमात मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी पणजीच्या पोरणे सचिवालयासमोर ध्वजारोहण केले, पोलीस परेडची पाहणी केली आणि विविध दलांना तसेच सरकारी अधिकार्यांना पदके प्रदान केली. कर्नाटक पोलीस दलाच्या तुकडीनेही यात सहभाग घेतला. बालभवनच्या विद्यार्थ्यांनी राष्ट्रगीत सादर करून कार्यक्रमाचा समारोप केला.
या वेळी राज्याचे मुख्य सचिव वी. कांडावेलू, राज्यसभा खासदार सदानंद शेट तानावडे, केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक, विरोधी पक्षनेते युरी आलेमाव, पोलीस महासंचालक आलोक कुमार, महसूल मंत्री बाबुश मोन्सेरात, आमदार रुडॉल्फ फर्नांडिस यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.