पणजी : यंदाच्या स्वातंत्र्यदिनानिमित्त गोवा पोलीस दलातील तीन अधिकाऱ्यांना त्यांच्या अतुलनीय सेवेबद्दल प्रतिष्ठित राष्ट्रपती पदक जाहीर झाले आहे. यात दोन अधिकाऱ्यांना 'उत्कृष्ट सेवा पदक', एका अधिकाऱ्याला 'विशिष्ट सेवा पदक' तर एका अधिकाऱ्याला गृहरक्षक दलातील उत्कृष्ट सेवेसाठी 'राष्ट्रपती गृहरक्षक पदक' प्रदान करण्यात येणार आहे. उत्कृष्ट सेवा पदकासाठी पोलीस अधीक्षक गुरुदास गावडे आणि उपअधीक्षक गुरुदास आनंद कदम यांची निवड करण्यात आली आहे. आपल्या प्रामाणिक सेवेसाठी हेड कॉन्स्टेबल जुबेर मोमीन यांना 'विशिष्ट सेवा पदक' देण्यात येणार आहे. याशिवाय, गृहरक्षक दलातील रामचंद्र तुळसकर यांनाही उत्कृष्ट सेवेसाठी 'राष्ट्रपती गृहरक्षक पदक' जाहीर करण्यात आले आहे. त्यांच्या कार्याची दखल राष्ट्रीय स्तरावर घेतल्याबद्दल पोलीस महासंचालकांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.