बांधकामे कायदेशीर करण्याच्या निर्णयाला कोमुनिदादींचा विरोध

अॅटर्नी, प्रतिनिधींच्या २४ रोजी होणाऱ्या बैठकीत पुढील कृती ठरणार : व्हेंझी व्हिएगस.

Story: वेब डेस्क । गोवन वार्ता |
3 hours ago
बांधकामे कायदेशीर करण्याच्या निर्णयाला कोमुनिदादींचा विरोध

पणजी : कोमुनिदाद जमिनीतील घरे व बांधकामे कायदेशीर करण्याच्या निर्णयाला राज्यातील बहुसंख्य कोमुनिदादींच्या पदाधिकारी, प्रतिनिधींनी विरोध सुरू केला आहे. विधेयकाविरोधात राज्यपालांना निवेदन देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. २४ ऑगस्टला राज्यातील सर्व कोमुनिदादीचे पदाधिकारी, प्रतिनिधी यांची यासंदर्भात महत्त्वाची बैठक होणार आहे. त्यात अंतिम निर्णय होऊन पुढील कृती ठरविण्यात येणार आहे.

गोवा विधानसभेत संमत झालेल्या विधेयकाला विरोध करण्यासाठी व राज्यपालांनी त्यावर स्वाक्षरी करून अंतिम मोहोर उठवू नये म्हणून कोमुनिदाद पदाधिकारी, प्रतिनिधी एकवटत आहेत. २४ ऑगस्ट रोजी पर्वरीत होणाऱ्या बैठकीत नेमके चित्र स्पष्ट होणार आहे. कोमुनिदाद कायद्याचा अभ्यास करून पुढील कृती ठरविण्यात येईल, असे करमळी कोमुनिदादचे अध्यक्ष व्हेंझी व्हिएगस यानी सांगितले.

राज्यातील कोमुनिदादींनचे अॅटर्नी व प्रतिनिधींची पणजीत बैठक झाली. या बैठकीला बऱ्याच जणांची उपस्थिती होती. बैठकीनंतर पत्रकार परिषद घेऊन यासंदर्भात सविस्तर माहिती देण्यात आली. यावेळी जुवे कोमुनिदादचे अॅटर्नी सुकुर मिनेझिस, आसगाव कोमुनिदादचे अॅटर्नी नेल्सन फर्नांडिस व इतर कोमुनिदादींचे अॅटर्नी उपस्थित होते.

कोमुनिदादच्या जमिनी या सरकारच्या जमिनी नाहीत. कोमुनिदादींना विश्वासात न घेता परस्पर विधेयक संमत करणे अयोग्य आहे. कोमुनिदादी या जुन्या संस्था आहेत. राज्यातील सर्व कोमुनिदादी रविवारपूर्वी विधेयकाला विरोध करणारा ठराव संमत करतील. कोमुनिदादीच्या व्यवस्थापकीय समिती हा ठराव घेतील. हा ठराव घेतल्यानंतर २४ ऑगस्ट रोजी पर्वरी येथील सेंट झेवियर रिसर्च केंद्रामध्ये मान्सून फेलोशीप ही बैठक होईल. या बैठकीत कोमुनिदादींची अॅटर्नी व प्रतिनिधी उपस्थित असतील. कोमुनिदाद कायदा व संमत झालेल्या विधेयकाबाबत सदस्यांना मार्गदर्शन करण्यात येईल. तसेच विधेयकाविरोधात पुढील कृती ठरविण्यात येणार आहे. यावेळी विधानसभेत संमत झालेल्या विधेयकाला राज्यपालांनी मान्यता देऊ नये, अशी मागणी केली जाईल तसेच राज्यपालांना याबाबत निवेदन सादर करण्यात येईल, असें व्हेंझी व्हिएगस यांनी सांगितले.

कोमुनिदाद कायदा व विधानसभेत संमत झालेल्या विधेयकावर राज्यातील नामवंत वकीलही अभ्यास करीत आहेत, अशी माहिती जुवे कोमुनिदादीचे अॅटर्नी सुकूर मिनेझीस यांनी दिली.

हेही वाचा