गोवा सरकार कर्नाटककडून १ लाख नारळांची खरेदी करणार
पणजी : ऐन चतुर्थीच्या तोंडावर वाढलेली नारळाची मागणी व दरांवर नियंत्रण ठेवण्यासाठी गोवा सरकारने अनुदानित दरात नारळ विक्रीचा उपक्रम राबवला आहे. सध्या बाजारात मोठ्या आकाराच्या नारळाची किंमत ६० ते ७० रुपये आहे, मात्र आता तेच नारळ गोवेकरांना फक्त ४५ रुपयांत उपलब्ध होणार आहेत. या उपक्रमासाठी शेजारच्या कर्नाटक राज्यातून सुमारे १ लाख नारळ खरेदी करण्यात आल्याची माहिती गोवा फलोत्पादन महामंडळाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली.
कृषी मंत्री रवी नाईक यांच्या सूचनेनुसार, कृषी विभाग आणि गोवा राज्य फलोत्पादन महामंडळाने सणासुदीच्या काळात ‘ना नफा, ना तोटा’ या तत्वावर नारळ विक्री सुरू केली आहे. कर्नाटकात मोठ्या आकाराच्या नारळाची किंमत प्रति नग ४० रुपये असून, तेच नारळ गोव्यात ५ रुपयांच्या किरकोळ नफ्यासह ४५ रुपयांना विक्रीस ठेवले आहेत.
पहिल्या टप्प्यात दोन दिवसांत कर्नाटकातून २५ हजार नारळांची आवक झाली. यामुळे बाजारातील पुरवठा वाढून दर स्थिर राहण्यास मदत झाली. या नारळांची विक्री गोवा फलोत्पादन महामंडळाच्या केंद्रांबरोबरच राज्यातील मोबाईल व्हॅनद्वारेही सवलतीच्या दरात करण्यात येत आहे. पुढील काही दिवसांतही कर्नाटकातून अशाच प्रकारे नारळांचा पुरवठा करण्यात येणार असल्याचे प्रेमेंद्र शेट यांनी सांगितले.