आतापर्यंत १६६५ कामगारांची आरोग्य तपासणी
मडगाव : कुटबण जेटीवर येणार्या परप्रांतीय कामगारांची बाळ्ळी आरोग्य केंद्राच्या कर्मचार्यांकडून आरोग्य तपासणी केली जात आहे. आतापर्यंत १६६५ कामगारांची आरोग्य तपासणी करण्यात आली आहे. यापूर्वी सहा कॉलराचे रुग्ण आढळून आले होते. ही संख्या १३ वर पोहोचली आहे. संबंधित खात्यांकडून आवश्यक त्या सर्व उपाययोजना केल्या जात आहेत.
कुटबण जेटीवर आरोग्य व स्वच्छतेच्या समस्या निर्माण होत आहेत. यावर सर्व भागधारकांची बैठक आयोजित करावी. जेटीच्या पाहणीसह याआधी सुचवलेल्या उपाययोजनांची अंमलबजावणी या विषयांवर चर्चा व्हावी, अशी मागणी गोवा कॅनकडून उपजिल्हाधिकार्यांकडे करण्यात आली होती. त्यानुसार गुरुवारी उपजिल्हाधिकारी लक्ष्मीकांत देसाई, मामलेदार, वेळ्ळीचे सरपंच, कुटबण जेटीवरील दोन्ही मासेमारी संघटना, आरोग्य विभाग, मत्स्य खात्याचे अधिकारी, गोवा कॅन व संबंधित भागधारकांची संयुक्त बैठक झाली.
मासेमारी हंगामासाठी जेटीवर दाखल झालेल्या कामगारांच्या आरोग्याशी संबंधित अनेक प्रश्न निर्माण झालेले आहेत. कुटबण जेटी व परिसरातील लोकांच्या आरोग्य आणि स्वच्छतेच्या समस्यांवर उपाययोजनांची गरज आहे. गेल्यावर्षी, सप्टेंबर २०२४ मध्ये कॉलराची साथ पसली होती. उपजिल्हाधिकार्यांनी प्रत्यक्ष पाहणी व बैठकांद्वारे मत्स्यव्यवसाय विभागाला कुटबण जेटी व परिसरातील स्वच्छता राखण्यासाठी आवश्यक पावले उचलण्याचे निर्देश दिले होते. कुटबण जेटीवरील आरोग्य आणि स्वच्छतेच्या समस्या सोडवण्यासाठी मत्स्य व्यवसाय संचालनालयाने केलेल्या उपाययोजनांची माहिती देण्यात आली. यावेळी आरोग्य अधिकार्यांनी आतापर्यंत १६६५ कामगारांची आरोग्य तपासणी करण्यात आल्याची माहिती दिली. या तपासणीमुळे आतापर्यंत १३ कॉलराचे रुग्ण आढळल्याची माहितीही दिली.
केळशी सरपंचांनी उपजिल्हाधिकार्यांना निवेदन दिले आहे. चिंचणी आरोग्य केंद्राकडून त्याठिकाणी पाहणी केली जाते. त्याठिकाणी पाहणी करण्यावरही चर्चा करण्यात आली. कुटबण जेटीवर मागीलवर्षी मुख्यमंत्र्यांनी भेट देत अनेक सूचना केलेल्या होत्या. त्यावर जेटी व्यवस्थापन समितीकडून अंमलबजावणी होते. मत्स्य खात्याकडून झालेल्या बैठकीतील सूचनांची अंमलबजावणीसाठी संयुक्त बैठक घेण्यात येणार असल्याचे गोवा कॅनच्या लॉर्ना फर्नांडिस यांनी सांगितले. कुटबण येथील बैठकीनंतर जेटीवर पाहणी करत साथीचे रोग पसरू नये जेटीवरील जाळी, बोटी काढण्याच्या सूचना केल्या असून, कामगारांच्या वैयक्तिक स्वच्छतेवर भर देण्याच्या सूचना बोटमालकांना करण्यात आल्या आहेत.