शिल्पा शेट्टी, राज कुंद्रा यांच्या अडचणी वाढल्या; ६० कोटी रुपयांच्या फसवणूक प्रकरणी गुन्हा नोंद

Story: वेब डेस्क । गोवन वार्ता |
2 hours ago
शिल्पा शेट्टी, राज कुंद्रा यांच्या अडचणी वाढल्या; ६० कोटी रुपयांच्या फसवणूक प्रकरणी गुन्हा नोंद

मुंबई : अभिनेत्री शिल्पा शेट्टी आणि तिचा नवरा राज कुंद्रा यांच्या अडचणी दिवसेंदिवस वाढत आहेत. मुंबईतील जुहू पोलीस स्थानकात शिल्पा शेट्टी, राज कुंद्रा व एका अज्ञात व्यक्तीविरुद्ध ६० कोटी रुपयांच्या फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यासंदर्भात मिळालेली माहिती अशी की, आर्थिक गुन्हे शाखेने मुंबईतील एका व्यावसायिकाविरुद्ध ६०.४८ कोटी रुपयांच्या फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. शिल्पा व राज यांच्या बंद पडलेल्या बेस्ट डील टीव्ही प्रायव्हेट लिमिटेडसाठी घेतलेले कर्ज व गुंतवणूक कराराशी संबंधित आहे.

प्रकरण काय ?

उद्योगपती दीपक कोठारी यांनी शिल्पा व राज कुंद्रावर आरोप केले आहेत. या दोघांना २०१५ ते २०२३ च्या सुमारास व्यवसाय विस्तारासाठी ६०.४८ कोटी रुपये दिले होते. परंतु त्यांनी ते वैयक्तिक खर्चासाठी वापरले. २०२५ मध्ये एजंट राजेश आर्य यांच्यामार्फत शिल्पा शेट्टी व राज कुंद्रा यांच्या संपर्कात आले होते, असा दावाही दीपक कोठारी यांनी केला आहे.

अभिनेत्री शिल्पा आणि राज कुंद्रा त्यावेळी ऑनलाइन शॉपिंग प्लॅटफॉर्म, बेस्ट डील टीव्हीचे संचालक होते. त्यामुळे शिल्पा शेट्टी यांच्याकडे कंपनीचे ८७ टक्क्यांहून अधिक शेअर्स होते. त्याचवेळी राजेश आर्य यांनी कंपनीसाठी १२ टक्के वार्षिक व्याज दराने ७५ कोटी रुपयांचे कर्ज मागितले होते. मात्र, जास्त कर टाळण्यासाठी त्यांनी हे पैसे गुंतवण्याचा सल्ला दिला. त्यानंतर एक बैठक झाली व पैसे वेळेवर परत केले जातील या आश्वासनासह करार ठरवण्यात आला होता, असा आरोप दीपक कोठारी यांनी केला आहे.

शिल्पाच्या वकिलाचे म्हणणे..

शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्रा यांचे वकील प्रशांत पाटील यांनी सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. ऑक्टोबर २०२४ मध्ये राष्ट्रीय कंपनी कायदा न्यायाधिकरणामध्ये यावर आधीच निर्णय झाला आहे. या प्रकरणात कोणताही गुन्हेगारीपणा नाही व त्यांनी सर्व आवश्यक कागदपत्रे ईओडब्ल्यूला सादर केली आहेत, असा दावा वकिलाने केला आहे.

हेही वाचा