कोलकाता : भारतीय हॉकी संघातील माजी दिग्गज खेळाडू आणि ज्येष्ठ क्रीडावैद्यक तज्ज्ञ डॉ. व्हेस पेस यांचे गुरुवारी कोलकात्यात वृद्धापकाळाने निधन झाले. ते ८० वर्षांचे व पार्किन्सनने (parkinson's disease) ग्रस्त होते. मंगळवारी पहाटे त्यांना कोलकात्यातील वुडलँड्स हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते.
डॉ. व्हेस पेस हे १९७२ च्या म्युनिक ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदक (Olympics broze) जिंकणाऱ्या भारतीय हॉकी संघाचे सदस्य होते. यापूर्वी त्यांनी १९७१ साली बार्सिलोना येथे झालेल्या हॉकी विश्वचषकातही कांस्यपदक पटकावणाऱ्या भारतीय संघात मिडफिल्डर म्हणून कामगिरी बजावली होती. हॉकीव्यतिरिक्त फुटबॉल, क्रिकेट आणि रग्बी या खेळांमध्येही त्यांनी प्रशासकीय कारकीर्द गाजवली. १९९६ ते २००२ दरम्यान ते इंडियन रग्बी फुटबॉल युनियनचे अध्यक्षही होते.
गोव्यातीलअसोळणा गावचे रहिवासी असलेले व्हेस पेस यांचे मातृघर वेळ्ळी येथे आहे. क्रीडा क्षेत्र गाजवल्यानंतर त्यांनी क्रीडावैद्यक तज्ज्ञ (doctor in sports medicine) म्हणूनही काम केले. आशियाई क्रिकेट परिषद, भारतीय क्रिकेट नियामक मंडळ तसेच भारतीय डेव्हिस कप संघासह अनेक क्रीडा संस्थांचे वैद्यकीय सल्लागार म्हणून त्यांनी सेवा बजावली आहे. त्यांची पत्नी जेनिफर या माजी भारतीय बास्केटबॉल खेळाडू असून राष्ट्रीय संघाच्या कर्णधारपदाची जबाबदारी त्यांनी सांभाळली होती.
व्हेस पेस यांचा मुलगा लिएंडर पेस (Leander Paes) हा भारताचा सर्वात यशस्वी टेनिसपटू असून त्याने १८ ग्रँडस्लॅम किताबांसह १९९६ च्या अटलांटा ऑलिम्पिकमध्ये पुरुष एकेरीत कांस्यपदक जिंकत कुटुंबाची ऑलिम्पिक पदकाला गवसणी घालण्याची परंपरा कायम राखली. व्हेस पेस यांचे अंतिम संस्कार सोमवारी किंवा मंगळवारी परदेशात राहणाऱ्या त्यांच्या मुलींच्या आगमनानंतर पार पडतील.