दक्षिण गोव्यात सीसीटीव्ही सर्वेलन्ससह पोलीस गस्त वाढवण्याची मागणी
मडगाव : मुंगूल माडेल येथील गँगवॉरच्या घटनेमुळे लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. यातील दोन्ही बाजूच्या संशयितांची ओळख पटवून कारवाई झाल्यास भविष्यात असे प्रकार होणार नाहीत. रात्रभर सुरु असणार्या पब, रेस्टॉरंटवर कारवाई व्हावी. याशिवाय सीसीटीव्ही सर्वेलन्ससह पोलीस गस्त वाढवावी, अशी मागणी आमदार व्हेंझी व्हिएगस यांनी केली.
आमदार व्हेंझी व्हिएगस यांच्यासह आपच्या पदाधिकार्यांनी दक्षिण गोवा जिल्हा पोलीस अधीक्षक टिकमसिंग वर्मा यांची भेट घेतली. मुंगूल माडेल येथील गँगवॉरच्या घटनेनंतर संशयितांवर कारवाईची मागणी केली. आमदार व्हेंझी यांनी सांगितले की, मुंगूल फातोर्डा याठिकाणी गँगवॉरची घटना घडली. यात स्थानिक कुणीच नाहीत. तर दुसर्या गावातील व्यक्तींनी येऊन हा प्रकार केला. याआधी कोलवा सर्कलकडेही अशाप्रकारची घटना घडली होती. दोन गँगमधील श्रेष्ठत्वासाठीचा वाद असून या गँगवॉरमुळे लोकांमध्ये भीती निर्माण झाली आहे. राज्यातील पोलिसांची कामगिरी सुधारण्याची गरज आहे. केंद्र सरकारच्या अहवालानुसार गोवा पोलिसांच्या कामगिरीचा आलेख योग्य नाही.
विविध भागात गस्त घालणे, सीसीटीव्ही कॅमेर्यांची उभारणी करून सर्वेलन्स करणे आवश्यक असून राज्य सरकारनेही या गोष्टी गांभीर्याने घेण्याची गरज आहे. कोलवा येथील मार्गारिटा रेस्टॉरंट रात्री उशिरापर्यंत सुरु असते. त्याचठिकाणाहून हे संशयित बाहेर पडले व त्यानंतर ही घटना घडली. याबाबत विधानसभा सभागृहातही प्रश्न उपस्थित केलेले होते. दोन्ही गँगमधील संशयितांना अटक करावी. त्यांच्याकडून बाँड घेण्यात यावा व त्यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी केली.
चित्रपटात पाहिलेले गँगवॉर आता गोव्यात घडू लागलेले आहेत. सीसीटीव्ही घालण्यासह गस्त वाढवण्याची मागणी केलेली आहे, असे रॉक मास्कारेन्हस म्हणाले. पंच जेर्सन यांनी सांगितले की, पोलिसांवर अशाप्रकारच्या गँगवॉरमध्ये तपास करताना दबाव असल्याचे दिसते. पोलिसांचे काहींशी लागेबांधे आहेत का अशी शंकाही सामान्य व्यक्तींना येते. गोव्यात ठिकठिकाणी गँग्सची निर्मिती झालेली असून यातून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत आहे. सरकारने आवश्यक वाहने गस्तीसाठी उपलब्ध करावीत, असेही सांगितले.
दक्षिण गोवा पोलीस अधीक्षकांनी गँगवॉरच्या घटनेत काहीजणांना अटक केलेली असून काही संशयितांची ओळख पटवण्याचे काम सुरु असल्याचे सांगितले. तसेच याप्रकरणात अजूनही तपास सुरु असल्याचे स्पष्ट केले.