दुहेरी खूनप्रकरणाने इंदूरमध्ये खळबळ
इंदूर : पत्नीचे विवाहबाह्य संबंध उघडकीस आल्याने राग अनावर झालेल्या पतीने तिचा प्रियकर आणि तिचा लाकडी दांड्याने जोरदार वार करून जीव घेतला. याप्रकरणाने इंदूर हादरले आहे.
इंदूरचे पोलीस उपअधीक्षक उमाकांत चौधरी यांनी यासंदर्भात सविस्तर माहिती दिली. सोमवारी ११ ऑगस्ट रोजी किशनगंज पोलिसांना सूत्रांकडून माहिती मिळाली की, एका व्यक्तीने आपल्या पत्नीचा व तिच्या प्रियकराचा खून केला आहे. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी जाऊन संजय भुरिया याला ताब्यात घेऊन त्याची चौकशी सुरू केली. चौकशीत त्याने सांगितले की, आपली पत्नी लक्ष्मी व प्रियकर यांचे विवाहबाह्य संबंध होते. घरात त्याने या दोघांना एकत्र पाहिले व त्याच्या रागाचा पारा चढला.
त्यानंतर दांड्याने दोघांवरही प्रहार केला. दांड्याच्या माराने महेश निपचीत पडला व नंतर गतप्राण झाला. पत्नी लक्ष्मी गंभीर जखमी झाल्यानंतर महेशने कसेबसे प्रयत्न करून तिला इस्पितळात नेले. मात्र, तेथे पोहोचेपर्यंत पत्नीने प्राण सोडला. याप्रकरणी इंदूर पोलिसांनी संजय भुरिया याला अटक केली असून पुढील तपास सुरू आहेत.